चंडीगड : अनिल कुंबळेने १९९९ साली पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला होता. त्यानंतर २१ वर्षानंतर आणखी एका भारतीयाने अनिल कुंबळेचा कित्ता गिरवला आहे. १६ वर्षांच्या काशवी गौतमने चंडीगडच्या अंडर-१९ महिला टीमकडून खेळताना अरुणाचल प्रदेशच्या १० विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशवी गौतमच्या या बॉलिंगमुळे अरुणाचलचा फक्त २५ रनवर ऑलआऊट झाला. त्यामुळे चंडीगडला या मॅचमध्ये १६१ रननी विजय मिळाला. काशवीने ४.५ ओव्हरमध्ये १ मेडन टाकत १२ रन देऊन अरुणाचलच्या १० विकेट घेतल्या. बॅटिंग करत असताना ४९ रन करणाऱ्या काशवीने चंडीगडसाठी बॉलिंगला सुरुवात केली आणि २९ बॉलमध्ये मॅच फिरवली.


काशवीने विकेट घेतलेले ८ खेळाडू शून्यवर माघारी परतले. काशवीने या सगळ्या विकेट या स्वत: म्हणजेच कोणत्याही फिल्डरची मदत न घेता घेतल्या. काशवीने ४ बॅट्समनना बोल्ड तर ६ बॅट्समनना एलबीडब्ल्यू केलं.



काशवीने ३ वर्षांआधी १३ वर्षांची असताना पंजाबसाठी अंडर-१९ क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या मोसमात काशवीने चंडीगडसाठी ६३ विकेट घेतल्या आहेत. मोसम संपताना १०० विकेट घेण्याचं काशवीचं लक्ष्य आहे.


काशवीच्या आधी अनिल कुंबळेने, देबाशिष मोहंतीने २००१ साली अगारतळामध्ये झालेल्या साऊथ झोन विरुद्ध ईस्ट झोनच्या मॅचमध्ये, रेक्स सिंगने २०१९ साली मणीपूर विरुद्ध मिझोरामच्या रणजी मॅचमध्ये १० विकेट घेतल्या होत्या. पण मर्यादीत ओव्हरच्या क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारी काशवी पहिली भारतीय खेळाडू आहे.