म्हणून बंगला सोडून एका खोलीच्या घरात राहायला गेला कार्तिक
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
मुंबई : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.
एकसारखा टीमच्या आतबाहेर असलेल्या दिनेश कार्तिकनं धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण धोनी टीममध्ये असल्यामुळे दिनेश कार्तिकला फारशी संधी मिळाली नाही. तरीही कार्तिकनं हिंमत सोडली नाही. कार्तिकला वेळोवेळी पाठिंबा दिला तो क्रिकेटपटू अभिषेक नायरनं.
आयपीएल २०१६ मध्ये दिनेश कार्तिकला २ कोटी रुपयांना विकला गेला होता. याआधीच्या लिलावात दिनेश कार्तिकला ९ कोटी रुपये मिळाले होते. अशाप्रकारे कामगिरी केली तर आपल्याला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, अशी भीती कार्तिकला वाटू लागली होती. त्याचवेळी कार्तिकनं अभिषेक नायरची मदत घेतली.
२०१६ च्या आयपीएलआधी दिनेश कार्तिक मुंबईत अभिषेक नायरकडे आला. अभिषेक नायरच्या घरामध्ये एका खोलीत दिनेश कार्तिक राहायला लागला. या खोलीतला शॉवर तुटलेला होता. तसंच खोलीही अस्वच्छ होती. एका टॉर्चर रुम सारखीच ही खोली होती.
कार्तिक माझ्याकडे आला तेव्हा मला त्याला अशा ठिकाणी न्यायचं होतं जिकडे तो कधीच राहिला नव्हता. कार्तिकनं हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे आग्रह धरला पण मी नाही म्हणलो, असं अभिषेक नायर म्हणाला आहे.
बॅटिंग करताना क्रिजचा वापर कसा करावा, फूटवर्क कसं करावं, कार्तिकचं हे ट्रेनिंग अभिषेक नायरनं घेतलं. नायरच्या या ट्रेनिंगचा फायदा कार्तिकला पहिले आयपीएलमध्ये झाला आणि मग भारतीय टीममध्ये कार्तिकनं पुनरागमन केलं.
या मदतीबद्दल दिनेश कार्तिकनं अभिषेक नायरचे आभार मानले आहेत. याआधी मी बॅटिंग करताना क्रीजच्या बाहेर येऊन खेळायचो पण अभिषेक नायरनं मला क्रीजचा वापर कसा करायचा ते शिकवलं, असं कार्तिक म्हणाला.