मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याचं आत्मचरित्र ‘281 एंड बियोंड’सध्या चर्चेत आहे. या पुस्तकामध्ये लक्ष्मणनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधले अनेक खुलासे केले आहेत, भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल हे अडेलतट्टू होते. त्यांना आंतरराष्ट्रीय टीमला कसं चालवलं जातं हेच माहिती नव्हतं, अशी टीका लक्ष्मणनं या पुस्तकात केली आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना भारतीय टीम दोन ते तीन गटांमध्ये विभागली गेली होती. खेळाडूंना एकमेकांवरही विश्वास नव्हता, असा धक्कादायक दावा लक्ष्मणनं केला आहे. प्रशिक्षकांच्या आवडीच्या खेळाडूंची खास काळजी घेतली जायची पण इतर खेळाडूंकडे कोणी लक्षही द्यायचं नाही. टीम आमच्या डोळ्यांसमोरच फुटली होती, असं लक्ष्मण म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट लेखक आर कौशिक यांच्यासोबत लक्ष्मणनं हे आत्मचरित्र लिहीलं आहे. ग्रेग चॅपल यांचा संपूर्ण कार्यकाळ कटू आठवणींचा होता. २००५ ते २००७ या कालावधीमध्ये ग्रेग चॅपल भारतीय टीमचे प्रशिक्षक होते.


या पुस्तकामध्ये लक्ष्मणच्या क्रिकेट कारकिर्दीमधल्या वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख आहे. लक्ष्मणचे लहानपणीचे दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा प्रवास, आयपीएल खेळताना आणि कॉमेंट्री करताना आलेला अनुभव, ड्रेसिंग रुममधले भावनिक क्षण, जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंसोबत आणि विरुद्ध खेळतानाचे अनुभव, वेगवेगळ्या वातावरणात आणि खेळपट्ट्यांवर खेळणं, प्रशिक्षक जॉन राईट यांचे सल्ले आणि ग्रेग चॅपल यांचा प्रतिकूल कालावधी या गोष्टींचा लक्ष्मणच्या पुस्तकात समावेश आहे.


'चॅपलनी टीम तोडली'


ग्रेग चॅपल मोठं नाव आणि समर्थन घेऊन भारतात आले होते. पण त्यांनी टीम फोडली. माझ्या कारकिर्दीमधल्या वाईट कालावधीमध्ये त्यांची सगळ्यात मोठी भूमिका होती. मैदानावरच्या निकालांमुळे वेगळं चित्र दिसत होतं पण आमच्या प्रशिक्षकांना त्याचं काही देणंघेणं नव्हतं. मी बॅट्समन असलेल्या ग्रेग चॅपल यांचा नेहमीच सन्मान करीन पण प्रशिक्षक म्हणून मी तसं करणार नाही. आधीच मतभेद असलेल्या टीममध्ये चॅपल यांनी असंतोषाची बीजं रोवली, असा आरोप लक्ष्मणनं केला आहे.


डॉक्टर बनण्याऐवजी मी क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला. हा पर्याय निवडणं कठीण होत, असं लक्ष्मण या पुस्तकात म्हणाला. या पुस्तकात लक्ष्मणनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अजहरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडसोबतच्या मैत्रीबद्दलही भाष्य केलं आहे. तसंच २००१ साली कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात खेळलेली २८१ रनच्या ऐतिहासिक खेळीबद्दलही लक्ष्मणनं भरभरून लिहिलं आहे.


अचानक निवृत्ती का घेतली?


लक्ष्मणनं २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. १८ ऑगस्ट २०१२ साली लक्ष्मणनं निवृत्त होण्याची घोषणा केली. त्याच्या एक आठवड्यातच न्यूझीलंडविरुद्ध लक्ष्मणचं घरचं मैदान असलेल्या हैदराबादमध्ये मॅच होणार होती.


धोनीमुळे निवृत्तीचा निर्णय?


धोनीसोबतच्या मतभेदांमुळे लक्ष्मणनं निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचंही तेव्हा बोललं गेलं होतं. पण या सगळ्या बातम्या लक्ष्मणनं फेटाळून लावल्या आहेत. माझ्या कारकिर्दीमधला हा एकमेव विवाद होता, असंही लक्ष्मण म्हणाला. कोणत्याही बाहेरच्या कारणांमुळे मी संन्यास घेतला नाही. कोणीही मला निवृत्त होण्यासाठी जबरदस्ती केली नसल्याचं लक्ष्मणनं या पुस्तकात लिहिलं आहे.


'सचिनचा सल्लाही ऐकला नाही'


निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेआधी मी सचिन तेंडुलकर आणि झहीर खानशी बोललो. सचिन तेव्हा एनसीएमध्ये होता आणि त्यानं मला पत्रकार परिषद टाळण्याचा सल्ला दिला. एक तास मी सचिनशी बोललो आणि मी आता निर्णय घेतला आहे, असं मी सचिनला सांगितल्याचा उल्लेख लक्ष्मणनं या पुस्तकात केला आहे.