IPL 2023 : मार्क वूडच्या गोलंदाजीसमोर दिल्ली ढेर; लखनऊ सुपर जाएंट्सचा 50 रन्सने मोठा विजय
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात हा सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा विजय झाला आहे. लखनऊने दिलेल्या 194 रन्सचं लक्ष्य पार करताना दिल्लीच्या टीमच्या नाकीनऊ आल्या.
IPL 2023 : आयपीएलमध्ये (IPL 2023) आज तिसरा सामना खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात हा सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा विजय झाला आहे. लखनऊने दिलेल्या 194 रन्सचं लक्ष्य पार करताना दिल्लीच्या टीमच्या नाकीनऊ आल्या. 20 ओव्हर्समध्ये दिल्लीच्या टीमला अवघ्या 143 रन्सपर्यंत मजल मारता आली.
लखनऊकडून दिल्लीला डोंगराएवढं लक्ष्य
लखनऊच्या सुपर जायंट्सने धमाकेदार फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 193 रन्स केले. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 194 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. लखनऊकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने 38 बॉल्समध्ये सर्वाधिक म्हणजेच 73 रन्स केले. तर निकोलस पूरनने 21 बॉल्समध्ये 36 रन्सची खेळी केली. या दोघांच्याही खेळीने मोठा स्कोर उभा करण्यास मदत झाली.
कर्णधार वॉर्नरची एकाकी झुंज व्यर्थ
194 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची धडाकेबाज सुरुवात झाली होती. दिल्लीने 4 ओव्हर्समध्ये नाबाद 40 रन्स केले होते. मात्र यावेळी लखनऊचा गोलंदाज मार्क वूडने पृथ्वी शॉची विकेट घेत दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर लगेच पुढच्या बॉलवर दुसरी विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर ढकलंल. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर टीमची एक बाजू धरून ठेवली होती. वॉर्नरने 48 बॉल्समघ्ये 56 रन्स केले. त्याने त्याच्या या खेळीत सात चौकार मारले. अखेर आवेश खानच्या गोलंदाजीवर त्याने विकेट गमावली. याच ठिकाणी दिल्लीच्या हातातून सामना निसटला. वॉर्नरसोबत रिले रूसोने देखील सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघांचे प्रयत्न फेल ठरले.
मार्क वूडच्या गोलंदाजीपुढे दिल्लीने टेकले गुढघे
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने दिल्लीच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. पाचव्या ओव्हरमध्ये वूडने सलग दोन बॉल्समध्ये 2 विकेट्स काढले. यामध्ये त्याने तिसऱ्या बॉलवर पृथ्वी शॉ आणि चौथ्या बॉलवरवर मिचेल मार्शला क्लीन बोल्ड केलं. याशिवाय सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानला देखील वूडने पव्हेलियनमध्ये पाठवलं. तर 20 व्या ओव्हरमध्ये वूडने अक्षर पटेलला शिकार केलं. या सामन्यात वूडने 4 फलंदाजांना माघारी धाडलं.