`धोनीच्या सल्ल्याचा अनेकवेळा उपयोग नाही`; टीम इंडियाच्या सदस्याचा दावा
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या मैदानातल्या रणनितीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे.
मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या मैदानातल्या रणनितीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. धोनीच्या एका सल्ल्याने संपूर्ण मॅचचं चित्र पालटलेलं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. भारताचा स्पिनर कुलदीप यादवचं याबद्दलचं मत मात्र वेगळं आहे. धोनीचे सल्लेही चुकतात, अनेकवेळा त्याची रणनिती चुकीची ठरते. धोनीही माणूसच आहे, असं वक्तव्य कुलदीप यादवने केलं आहे.
'धोनीचा निर्णय चुकीचा ठरला, तरी तुम्ही त्याला काही बोलू शकत नाही,' असं उत्तर कुलदीप यादवने हसत दिलं. 'मॅच सुरु असताना धोनी फार काही बोलत नाही, पण जर त्याला वाटलं तर तो ओव्हरच्या मध्ये येऊन सल्ला देतो,' असं कुलदीप यादव म्हणाला.
कुलदीप यादव हा वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या टीम इंडियाचा सदस्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक झाली. कोलकात्याकडून खेळताना कुलदीपने ९ मॅचमध्ये फक्त ४ विकेट घेतल्या.
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही विजय मिळवला. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ८ वेळा फायनल गाठली, यातल्या ३ वेळा त्यांचा विजय झाला.