मुंबई: सध्या आयपीएल स्पर्धा सुरु असल्याने सोशल मीडियावर मैदानावरील आणि मैदानाबाहेरचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. आता यामध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या फजितीच्या प्रसंगाची भर पडलीय. आज गुढीपाडवा असल्याने मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र, या शुभेच्छा देताना मुंबई इंडियन्सने एक मोठा घोळ घातला. सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने सर्व चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यानंतर सिद्देश लाड आणि सुर्यकुमार यादव यांनी गुढी पाडवा कसा साजरा करत होतो, हे सांगताना मकरसंक्रातीला आम्ही तिळगुळ कसे वाटायचो, हा किस्सा सांगायला सुरुवात केली. ही चूक नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे सर्वांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल करायला सुरुवात केली. गुढीपाडवा आणि मकर संक्रातीमधील फरक माहिती नाही का? संपूर्ण माहिती घेऊन व्हिडीओ तयार का केला नाही? मराठी असूनही गुढी पाडवा आणि संक्रातीमधील फरक माहित नाही का? अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. या टीकेमुळे अखेर मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट डिलिट करण्यात आले. मात्र, तोपर्यंत या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईच्या संघाने बुधवारी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा ३७ धावांनी पराभव केला होता. या विजयासह मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा पहिला संघ होण्याचा बहुमान मिळवला होता. मुंबईने आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून ते आतापर्यंत एकूण १७५ सामने खेळल्या आहेत. त्यापैकी १०० सामने मुंबईने जिंकले आहेत. विशेष म्हणजे यातील एक विजय हा सुपर ओव्हरमध्ये मिळवला आहे. तर ७५ मॅच मध्ये मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.