मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा फटका सगळ्याच क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातल्या सगळ्याच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जर्मनीतली फूटबॉल लीग बन्डसलिगा रिकाम्या स्टेडियममध्ये मॅच भरवण्याच्या विचारात आहे. मे महिन्यापासून ही स्पर्धा सुरू करण्याचा आयोजकांचा मानस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बन्डसलिगाप्रमाणेच क्रिकेटचे काही सामनेही प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात मार्च महिन्यात झालेली पहिली वनडे पाहण्यासाठी एकही प्रेक्षक स्टेडियममध्ये नव्हता. रणजी ट्रॉफीची सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यातल्या फायनल मॅचच्या पाचव्या दिवशीही एकाही प्रेक्षकाला स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला नाही.


भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतातल्या क्रिकेटच्या भवितव्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. नजिकच्या भविष्यात भारतात क्रिकेट खेळणं शक्य नाही. जेव्हा माणसांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो, तेव्हा खेळाने मागे राहावं, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.


'जर्मनी आणि भारतामधलं सामाजिक वास्तव वेगळं आहे. नजिकच्या भविष्यात भारतात क्रिकेट खेळवलं जाणार नाही. क्रिकेट खेळवण्याबाबत अनेक शंका आणि जर-तर आहेत. माणसाच्या आयुष्यापेक्षा खेळ मोठा नाही,' असं सौरव गांगुली एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाला.


कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली ३ वनडे मॅचची सीरिज रद्द करण्यात आली. तसंच आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपवरही कोरोनामुळे संकट ओढावलं आहे.