मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड झाली आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माला ओपनर म्हणून संधी दिली जाईल, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोहितला टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे रोहितसाठी आता टेस्ट क्रिकेटमध्ये ही नवी सुरुवात असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक झालेल्या विक्रम राठोड यांनी रोहित शर्माच्या या नव्या इनिंगवर भाष्य केलं आहे. 'रोहितसारख्या शानदार खेळाडूला खेळण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. मर्यादित ओव्हरमध्ये ओपनर म्हणून रोहितची कामगिरी उल्लेखनीय आहे, त्यामुळे टेस्टमध्ये ओपनर म्हणून रोहित अयशस्वी होण्याचं कोणतंही कारण नाही. जर त्याची रणनिती योग्य राहिली तर तो टीमसाठी मोठा खेळाडू ठरेल,' असं मत विक्रम राठोड यांनी मांडलं.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टी-२० मॅच मोहालीमध्ये खेळवली जाणार आहे. या मॅचआधी विक्रम राठोड यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी ऋषभ पंतलाही इशारा दिला.


केयरलेस आणि फियरलेस शॉट यांच्यातलं अंतर समजणं गरजेचं असल्याचं वक्तव्य विक्रम राठोड यांनी केलं आहे. 'प्रत्येक युवा क्रिकेटपटूला न घाबरता खेळलं पाहिजे, पण त्यांनी निष्काळजीपणे खेळता कामा नये. टीम प्रशासन पंतकडून अशाच खेळाची अपेक्षा करत आहे. ही गोष्ट समजण्याइतका पंत हुशार आहे,' अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली.


टीमच्या वातावरणात एकरुप होण्यासाठी मला जास्त अडचण येणार नाही, पण थोडा वेळ लागेल, असं राठोड यांनी सांगितलं.


भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ टी-२० आणि ३ टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जात आहे. यातली पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली, तर दुसरी टी-२० आज संध्याकाळी ७ वाजता खेळवण्यात येणार आहे. २२ सप्टेंबरला तिसरी टी-२० होईल आणि यानंतर टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. २ ऑक्टोबरपासून पहिली, १० ऑक्टोबरपासून दुसरी आणि २३ ऑक्टोबरपासून तिसरी टेस्ट सुरू होईल. 


भारताची टेस्ट टीम 


विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ऋषभ पंत, ऋद्धीमान सहा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह