शोएब नंतर आता हा पाकिस्तानी क्रिकेटर बनणार भारताचा जावई
पाकिस्तानी क्रिकेटर पडला भारतीय तरुणीच्या प्रेमात.
नवी दिल्ली : भारतीय मुलीच्या प्रेमात आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटर पडला आहे. शोएब मलिकनंतर हसन अली आता भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानातील उर्दू वृत्तपत्र एक्सप्रेस न्यूजने ही बातमी दिली आहे. पाकिस्तानी गोलंदाज हसन अली हरियाणाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.
पाकिस्तानी गोलंदाज हसन अली हरियाणाच्या नुंह जिल्ह्यात राहणाऱ्या शामिया आरजूसोबत विवाह करणार आहे. वृत्तपत्रात म्हटलं आहे की, दोघांच्या विवाहासाठी दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आहेत. रिपोर्ट्सनुसार, ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात हसन भारतीय मुलीसोबत विवाह करणार आहे.
हा विवाह दुबईमध्ये होण्याची शक्यता आहे. हसन अलीने देखील म्हटलं होतं की, चर्चा तर सुरु आहे पण अजून काहीही ठरलेलं नाही. मुलगी ही एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. शामियाने फरीदाबादमधून बिटेक (अॅरोनेटिकल) केलं आहे. शामिया ही अमीरात एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. याआधी ती जेट एअरवेजमध्ये होती.
याआधी पाकिस्तानी ऑलराउंडर शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत विवाह केला आहे. याआधी मोहसिन खानने देखील भारतीय अभिनेत्री रीना रॉयसोबत विवाह केला होता. पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.
शामियाचे वडील लियाकत अली हे बीडीपीओच्या पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यांनी म्हटलं की, मुलीचा विवाह कुटुंबातील व्यक्तींच्या माध्यमातून ठरला आहे. लियाकत यांचे आजोबा हे पाकिस्तानचे माजी खासदार आणि पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन सरदार तुफैल यांचे भाऊ आहेत.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर तुफैल पाकिस्तानला गेले तर त्यांचे भाऊ भारतातच राहिले. माजी खासदार तुफैल यांचं कुटुंब पाकिस्तानच्या कसूर येथे राहतात. या कुटुंबाच्या माध्यमातूनच हा विवाह ठरल्याचं बोललं जातं आहे.