पाकिस्तानचा खेळाडू विराटबद्दल बरळला, म्हणाला, ``टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये.. ``
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने विराटच्या T20 क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल भाष्य केलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ICC T20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. मंगळवारी बीसीसीआयने त्याच्या जागी रोहित शर्माची टी-20 संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेतूनच तो ही जबाबदारी पार पाडेल. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने विराटच्या T20 क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल भाष्य केलं आहे.
मुश्ताक पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर म्हणाला, "जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की, त्याला कर्णधारपद सोडायचं आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याचे संकेत आहेत. सध्या मला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दोन गट दिसतायत. यामध्ये एक गट मुंबईचा आहे आणि दुसरा दिल्लीचा आहे."
ICC T20 वर्ल्डकपची ही विराटची कर्णधार म्हणून शेवटची T20 स्पर्धा होती मात्र त्याने निराशा केली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात टीमचा पराभव झाला. या दोन्ही पराभवांमुळे टीम पहिल्या फेरीतूनच बाहेर पडली. गेल्या तीन सामन्यांमध्ये भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला.
"मला वाटतं की कोहली लवकरच आपल्या देशाकडून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून खेळून निवृत्त होईल. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या फ्रँचायझी संघासाठी खेळत राहील. मला वाटतं की त्याने या फॉरमॅटबद्दल जेवढं करता येईल ते केलं आहे," असंही मुश्ताक म्हणाला आहे.
यापूर्वी वर्ल्डकप दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही टीम इंडियाचे दोन भाग होणार असल्याचं म्हटलं होतं. विराटने स्पर्धेपूर्वी कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगून चुकीचं केलं, असे तो म्हणाला.