IND vs AUS Paris Olympic Hockey Match : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने (India Hockey Team) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा (India Beat Australia) पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय. ऑलिम्पिक इतिहासात तब्बल 52 वर्षांनी हॉकीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. याआधी 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. त्यावेळी गवताच्या मैदानावर सामने होत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचं पदक निश्चित?
भारतीय हॉकी संघाच्या या विजयामुळे पदकासाठी दावेदारी आणखी भक्कम केली आहे. भारतीय हॉकी खेळाडूंनी सामन्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. याचा परिणाम म्हणजे पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने दोन गोल करत मोठी आघाडी घेतली. पहिला गोल अभिषेकने केला. तर दुसरा गोल कर्णधार हरमनप्रीत सिंहने (Harmanpreet Singh) मारला. कर्णधार हरमनप्रीत सिंहचा पॅरिस ऑलिम्पिकमधला हा पाचवा गोल आहे. 


ऑस्ट्रेलियाचं कमबॅक
पहिल्या हाफ टाईमपर्यंत भारताने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली. कर्णधार हरमनप्रीत सिंह पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. हरमनप्रीत सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला तिसरा गोल करुन दिला. यामुळे भारताने 3-1 अशी भक्कम आघाडी घेतली. हरमनप्रीतचा ऑलिम्पिकमधलाहा सहावा गोल ठरला. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली. चौथ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा फायदा घेत ब्लॅक गोवर्सने गोल करत ऑस्ट्रेलियाला दुसरा गोल करुन दिला.


ऑस्ट्रेलियाने तिसरा गोल करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. पण भारतीय खेळाडूंच्या आक्रमणापुणे त्यांचे प्रयत्न अपूरे पडले. भारताचा गोलकिपर पी आर श्रीजेशने केलेल्या भक्कम बचावापुढे ऑस्ट्रेलियाला नमतं घ्यावं लागलं. भारताच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंहबरोबरच श्रीजेशचाही मोलाचा वाटा होता. ग्रुपमध्ये भारतीय हॉकी संघ आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.


बाराव्यांदा भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने
ऑलिम्पिक इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 12 वेळा आमने सामने आलेत. यात भारताने चार वेळा तर ऑस्ट्रेलियाने सहावेळा विजय मिळवलाय. दोन सामने ड्रॉ झाले. 1972 म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर शेवटचा विजय मिळवला होता. तर 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर 2020 ऑलिम्पिकमध्ये ग्रुप स्टेज सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-1 असा धुव्वा उडवला होता. 


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाची आतापर्यंतची कामगिरी दमदार झालीय. भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला 1-1 असं बरोबरीत रोखलं. त्यानंतर आयर्लंडवर 2-0 असा विजय मिळवला. पण ब्लेजिअमविरुद्ध 2-1 असा पराभव पत्करावा लागला. तर ऑस्ट्रेलियावर 3-2 अशी मात केली.