Prakash Padukone Blasts on Badminton Players: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटन खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली नसून लक्ष्य सेनच्या पराभवानंतर पदकाची आशा मावळली आहे. सोमवारी लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना झाला. यावेळी मलेशियाच्या खेळाडूने त्याचा पराभव करत भारताला आणखी एक पदक मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम दिला. यानंतर दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आणि संघाचे कोच, मेंटॉर प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) यांनी भारतीय बॅटमिंटन खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर नाराजी जाहीर केली आहे. खेळाडूंनी आता पुढे यावं आणि जिंकावं अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"उच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व समर्थन आणि आर्थिक मदत भारतीय खेळाडूंना देण्यात आली होती. आधीच्या खेळाडूंकडे सुविधा आणि निधीची कमतरता होती, पण आता तशी स्थिती नाही. त्यामुळे आमच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे पुढे जाण्याची आणि जिंकण्याची वेळ आली आहे," असं प्रकास पदुकोण यांनी लक्ष्य सेन कांस्यपदकाचा सामना गमावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 


लक्ष्य सेनने ऑलिम्पिकमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. पुरुष एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. पण त्याच्याव्यतिरिक्त इतर खेळाडू स्पर्धेतून सहज बाहेर पडले होते. 



पी.व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या 16व्या फेरीत चीनच्या हे बिंग जिओकडून पराभव पत्करावा लागला, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एच.एस. प्रणॉयला लक्ष्य सेनने 16व्या फेरीत बाहेर काढले तर अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो महिला दुहेरी स्पर्धेत गट स्टेजमधूनही बाहेर पडू शकले नाहीत.


"आमच्या कामगिरीवर मी थोडा नाराज आहे. बॅडमिंटनमध्ये आम्ही साधं एक पदकही जिंकू शकलो नाही. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, आम्ही तीन पदकांसाठी शर्यतीत होतो, त्यामुळे किमान एक पदक मिळालं असतं तरी आनंद झाला असता. यावेळी सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालय अशा प्रत्येकाने सर्वोत्तम दिलं होतं. त्यामुळे सरकारने जे केलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त इतर कोणी करु शकलं असतं असं वाटत नाही. मला वाटतं आता खेळाडूंनी जबाबदारी घ्यायला हवी," अशा शब्दांत प्रकाश पदुकोण यांनी आपली नाराजी जाहीर केली.


लक्ष्य सेनने जोरदार सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये 21-13 असा सहज विजय त्याने मिळवला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने जोरदार सुरुवात केली परंतु ली झी जियाने भक्कम आघाडी घेतली.  16-21 ने लक्ष्य सेनने दुसरा गेम गमावला. यानंतर लक्ष्य सेन पुनरागमन करुच शकला नाही. तिसऱ्या डावात 11-21 ने त्याचा पराभव झाला आणि पदकही निसटलं. 


प्रकाश पदुकोण यांनी कोर्टमध्ये वेगवान बाजूला खेळताना तो अस्वस्थ होतो असं म्हटलं. “तो नक्कीच चांगला खेळला पण, मी थोडा निराश झालो आहे. कालही तो खेळ पूर्ण करू शकला नाही. तो पहिल्या गेममध्ये विजयी स्थितीत होता आणि कदाचित कालच त्याला मोठा बदल घडवता आला असता. पहिला गेम जिंकल्यानंतर तो आज 8-3 ने आघाडीवर होता, तो नेहमी वेगवान बाजूने खेळताना थोडा अस्वस्थ असतो त्यामुळे त्याला त्यावर काम करावे लागेल,” असं ते म्हणाले. 


मी फक्त बॅडमिंटन खेळाडूंबद्दल बोलत नाही. सर्व खेळांमधील टॉप 30 खेळाडूंना ज्यांच्याकडे पदक जिंकण्याची संधी होती त्यांना जे हवं होतं ते दिलं. अनेकदा त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्याही पूर्ण करण्यात आल्या असा संताप त्यांनी व्यक्त केला.