पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला नुकसान भरपाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठी नामुष्की ओढावली आहे.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठी नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयला १.६ मिलियन युएस डॉलरची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विदेशीय सीरिज होत नसल्यामुळे सामंजस्य कराराचा भंग होत आहे, त्यामुळे बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ७० मिलियन डॉलर द्यावेत, अशी याचिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं टाकली होती. पण ही याचिका आयसीसीनं फेटाळून लावली होती.
या याचिकेवेळी झालेल्या खर्च वसूल करण्यासाठी आयसीसीनं ६० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यायला सांगितली. यामध्ये बीसीसीआयला यासाठी आलेला खर्च आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या पॅनलच्या व्यवस्थापकीय खर्च याचा समावेश होता. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही याचिका फेटाळण्यात आली होती.
२०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ६ द्विपक्षीय सीरिज व्हाव्या, यासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डामध्ये सामंजस्य करार झाला होता. पण बीसीसीआयनं या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत पाकिस्तानने आयसीसीकडे धाव घेतली होती. बीसीसीआयनं मात्र भारत सरकार आम्हाला पाकिस्तानशी खेळायला परवानगी देत नाही, अशी भूमिका मांडली होती. तसंच दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सीरिज कायदेशीररित्या बंधनकारक असल्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा दावा बीसीसीआयनं फेटाळून लावला होता.