दुबई : गेल्या आठवड्यात दुबईत दाखल झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) च्या खेळाडूंना ६ दिवसासाठी क्वारंटाईन असणं अनिवार्य केले आहे आणि या दरम्यान खेळाडूंची करण्यात आलेली कोरोना टेस्ट देखील नेगेटिव्ह आलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही संघांचे खेळाडू आता सराव करण्यास सज्ज झाले आहेत. दुबईची उष्णता टाळण्यासाठी या संघांनी संध्याकाळी सराव करण्याची योजना आखली आहे. युएईला किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचा संघ मागील आठवड्यातच पोहोचला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ची टीमही गेल्या गुरुवारी युएईला पोहोचली आहे. कोलकाता टीम अबू धाबी येथे आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) च्या मते, येथे दाखल झाल्यानंतर पहिल्या, तिसर्‍या आणि सहाव्या दिवशी या खेळाडूंची चाचणी घेण्यात आली आणि तिन्ही टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सराव करण्यासाठी उतरणार आहेत.


सहा दिवसांच्या मुक्कामादरम्यान खेळाडूंना खोल्या सोडण्याची परवानगी नव्हती. भारतातून येथे आलेल्या सर्व खेळाडूंची तीनदा चाचणी घेण्यात आली असल्याची देखील माहिती आहे. आता सर्व खेळाडू हे सरावाला सुरुवात करतील. 


राजस्थान रॉयल्स संघ आयसीसीच्या मैदानावर सराव करेल. यावर्षी राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलर मंगळवारी येथे दाखल झाला आणि आता क्वांरटाईनचा काळ संपल्यानंतरच त्याला सराव करता येणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हार्ड्स विलजोनला देखील क्वारंटाईन काळ पूर्ण करावा लागेल.


किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सूत्रांनी सांगितले की, 20 ऑगस्टला भारतातून आलेल्या सर्व खेळाडूंनी क्वारंटाईन काळ पूर्ण केला आहे. आता ते सराव करण्यास तयार झाले आहेत.' रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज ( CSK) संघ शुक्रवारी युएईमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या क्वांरटाईन काळ गुरुवारी संपेल. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान यूएईच्या तीन ठिकाणी दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे रंगणार आहे.