`हिंदी काही आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती फक्त...,` आर अश्विनने जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं; `जर तुम्हाला तामिळ...`
R Ashwin on Hindi Language: भारतीय क्रिकेटर आर अश्विनच्या (R Ashwin) विधानामुळे नव्याने भाषेचा वाद निर्माण झाला आहे. आर अश्विनने हिंदी ही राष्ट्रीय भाषा (National Language) नसल्याचं म्हटलं आहे.
R Ashwin on Hindi Language: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आर अश्विन याच्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात भाषण करताना आर अश्विनने हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसून, अधिकृत भाषा आहे असं म्हटलं आहे. आर अश्विनच्या या वक्तव्यामुळे नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात अश्विनने हे भाष्य केले. येथे हिंदी भाषेचा वापर नेहमीच एक संवेदनशील विषय राहिला आहे आणि त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आर अश्विनने विद्यार्थ्यांना संबोधित करताना समारंभात उपस्थित असणारे जर इंग्रजी किंवा तमिळमध्ये सोयीस्कर नसतील तर ते हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास तयार आहेत का? अशी विचारणा केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"सभागृहात असणाऱ्या इंग्रजी विद्यार्थ्यांनी, मला ओरडून दाखवा", असं अश्विन म्हणतो. यानंतर गर्दीतून आवाज येतो. यानंतर अश्विनने 'तामिळ' म्हणताच गर्दीतून एकच आवाज येतो. नंतर आर अश्विन हिंदी? म्हणताच गर्दी शांत होते. त्यावर आर अश्विन तामिळमध्ये म्हणतो, "मला वाटलं की मी हे बोललं पाहिजे. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे".
आर अश्विनच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची भिती आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके पक्षाने केंद्र सरकार राज्यांवर, खासकरुन दक्षिणेत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
त्याच कार्यक्रमात, अश्विनने टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या विषयावरही भाष्य केले. येथे, अनुभवी ऑफ-स्पिनरने राजकीय उत्तर दिलं. "जेव्हा कोणी म्हणतो की मी ते करू शकत नाही, तेव्हा मी ते पूर्ण करण्यासाठी तयार होतो. परंतु जर ते म्हणतात की मी करू शकतो, तर माझा रस कमी होतो," असं अश्विनने स्पष्ट केलं.
अश्विनने त्याच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या पार्श्वभूमीबद्दलही सांगितले. स्वतःच्या प्रवासातून मिळालेल्या शिकण्याबद्दल बोलताना, अश्विनने विद्यार्थ्यांना कधीही हार मानू नका आणि शंका आल्या तरी मार्गावर दृढ राहा असा सल्ला दिला. "जर एखाद्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्याने मला सांगितले असते की मी कर्णधार होऊ शकत नाही, तर मी अधिक मेहनत केली असती," असं सांगत आर अश्विनने विद्यार्थ्यांना शंका आल्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि चिकाटीने काम करण्यास प्रोत्साहित केले.
"जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही कधीच थांबणार नाही. जर तुम्ही तसे केले नाही तर शिकणं थांबेल आणि उत्कृष्टता हा फक्त एक शब्द राहील,” असं तो पुढे म्हणाला".