बंगळुरू : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड ज्युनियर क्रिकेटमध्ये त्याची छाप पाडताना दिसत आहे. १४ वर्षांच्या समितने मागच्या २ महिन्यांमध्ये दोन द्विशतकं केली आहेत. मल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना समितने नाबाद २११ रन केले. बीटीआर शिल्ड अंडर-१४ ग्रुपमध्ये समितने द्विशतक झळकावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समित द्रविडच्या या खेळीमध्ये २७ बाऊंड्रीचा समावेश होता. समितच्या या शानदार कामगिरीमुळे मल्ल्या आदिती टीमने ३८६/३ एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी टीमला २५४/३ एवढाच स्कोअर करता आला. त्यामुळे समितच्या टीमचा १३२ रननी विजय झाला आहे. याआधी डिसेंबर महिन्यात समित द्रविडने उपाध्यक्षिय-११ टीमकडून खेळताना धारवाड झोनविरुद्ध २५४ बॉलमध्ये २०१ रन केले होते.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर बरेच क्रिकेटपटू विश्रांती घेत असतानाच राहुल द्रविड मात्र याला अपवाद ठरला आहे. निवृत्त झाल्यानंतर द्रविड २०१५ साली भारत-ए टीमचा आणि अंडर-१९ टीमचा मुख्य प्रशिक्षक झाला.


द्रविड प्रशिक्षक असताना अंडर-१९ टीम २०१६ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली, तर २०१८ साली भारताने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला. २०१९ साली द्रविडची बंगळुरूमधल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड झाली. पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंच्या उदयाचं श्रेयही द्रविडला दिलं जातं.