पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी जिंकण्यापासून विदर्भ ५ विकेट दूर!
रणजी ट्रॉफीवर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरण्यासाठी विदर्भाची टीम फक्त ५ विकेट दूर आहे.
नागपूर : रणजी ट्रॉफीवर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरण्यासाठी विदर्भाची टीम फक्त ५ विकेट दूर आहे. रणजी ट्रॉफी फायनलच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी सौराष्ट्रचा स्कोअर ५८/५ असा आहे. सौराष्ट्रला अजून १४८ रनची आवश्यकता आहे. दिवसाअखेर विश्वराज जडेजा २३ रनवर नाबाद आणि कमलेश मकवाणा २ रनवर नाबाद खेळत आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आदित्य सरवटेनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि अक्षय वाखरेला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
चौथ्या दिवसाची सुरुवात ५५/२ अशी करणाऱ्या विदर्भाची दुसरी इनिंग २०० रनवर ऑल आऊट झाली. धम्रेंद्रसिंग जडेजानं विदर्भच्या सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. कमलेश मकवाणाला २ आणि जयदेव उनाडकट आणि चेतन सकारियाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये ५ रनची आघाडी मिळाल्यामुळे विदर्भनं सौराष्ट्रसमोर २०६ रनचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रला सुरुवातीपासूनच धक्के बसायला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला चेतेश्वर पुजारा दुसऱ्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला.
अशी झाली पहिली इनिंग
विदर्भनं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या ३१२ रननंतर बॅटिंगला आलेल्या सौराष्ट्रचा ३०७ रनवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या इनिंगप्रमाणे पहिल्या इनिंगमध्येही चेतेश्वर पुजारा अपयशी ठरला. आदित्य सरवटेनं पुजाराला पहिल्या इनिंगमध्ये फक्त १ रनवर आऊट केलं. पहिल्या इनिंगमध्ये आदित्य सरवटेनं सौराष्ट्रच्या ५ विकेट तर अक्षय वाखरेनं ४ विकेट घेतल्या. उमेश यादवला १ विकेट घेण्यात यश आलं. सौराष्ट्रचा ओपनर स्नेल पटेलनं सर्वाधिक १०२ रन केल्या.
विदर्भाचा पहिला डाव ३१२ रनवर संपुष्टात आला होता. अक्षय कर्णेवारने आठ फोर आणि दोन सिक्ससह १६० बॉलमध्ये शानदार दुसरे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसऱ्या बाजूने खेळणारा अक्षय वाखरेने कर्णेवारला चांगली साथ दिली. या दोघांनी ७८ रनची भागीदारी केली. अक्षय वाखरेने ३ फोरसह ३४ रनचे योगदान दिले. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने ३ तर चेतन सकारियाने २ विकेट घेतल्या. या मॅचमध्ये विदर्भनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता.