मुंबई : भारताचा सर्वोत्तम फास्ट बॉलर कोण हा प्रश्न विचारला तर पहिलं नाव कपिल देव यांचं घेतलं जातं. कपिल देव यांच्यानंतर मनोज प्रभाकर, जवागल श्रीनाथ, जहीर खान, आशिष नेहरा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या फास्ट बॉलरची नाव घेतली जातात. पण यादीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या आणि राजस्थान, पुडुच्चेरीकडून खेळणाऱ्या पंकज सिंग याचं नाव येत नाही. पण पंकज सिंग हा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३३ वर्षांच्या पंकज सिंगनं भारताकडून २ टेस्ट आणि १ वनडे खेळली आहे. रणजी ट्रॉफी २०१८-१९ या मोसमात पंकज पुड्डुचेरीकडून खेळत आहे. नागालँडविरुद्धच्या मॅचमध्ये पंकज सिंगनं ६ विकेट घेतल्या आहेत. याचबरोबर पंकज सिंग रणजी ट्रॉफीमध्ये ४०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर बनला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आत्तापर्यंत फक्त १० बॉलरना ४०० विकेटचा टप्पा ओलांडता आला आहे. कर्नाटकचा फास्ट बॉलर आर. विनय कुमार या यादीतला दुसरा फास्ट बॉलर बनू शकतो. विनय कुमारच्या नावावर रणजीमध्ये ३९२ विकेट आहेत.


रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ४०० विकेट घेणारे पहिले ९ बॉलर हे स्पिनर होते. आता पंकज कुमार या यादीत पोहोचला आहे. या यादीमध्ये राजिंदर गोयल, एस. वेंकटराघवन, बीएस चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी यांचा समावेश आहे. राजिंदर गोयल यांनी रणजीमध्ये सर्वाधिक ६२७ विकेट घेतल्या आहेत.


पंकज सिंगनं त्याच्या रणजी कारकिर्दीच्या बहुतेक मॅच या राजस्थानकडून खेळल्या आहेत. सध्या तो पुडुच्चेरीकडून खेळत आहे. या मोसमात पंकज सिंगनं ३ वेळा ५ विकेट आणि एका वेळा मॅचमध्ये १० विकेट घेतल्या आहेत.