दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतनं १५९ रनची नाबाद खेळी केली होती. या खेळीचा फायदा पंतला आयसीसीच्या क्रमवारीतही झाला आहे. ऋषभ पंत आयसीसीच्या बॅट्समनच्या टेस्ट क्रमवारीत २१ स्थानांची झेप घेत १७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही ऋषभ पंतची टेस्ट क्रिकेटमधली सर्वोत्तम क्रमवारी आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली ९२२ अंकांसह बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. १७व्या क्रमांकावर पोहोचलेल्या ऋषभ पंतनं ४५ वर्ष जुन्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. १९७३ साली फारुख इंजिनिअर याच क्रमांकावर होते. कोणत्याही भारतीय विकेट कीपरची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. तर धोनीची सर्वोत्तम क्रमवारी १९ होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतशिवाय चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवाल यांनीही क्रमवारीत उडी घेतली आहे. पुजारानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ५२१ रन केले. यामध्ये ३ शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. या कामगिरीमुळे पुजारा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रवींद्र जडेजा ६ स्थान वरती ५७व्या क्रमांकावर आणि मयंक अग्रवाल ५ क्रमांक वर ६२व्या क्रमांकावर पोहोचला आहे.


भारताचा स्पिनर कुलदीप यादवनं सिडनी टेस्टमध्ये ९९ रन देऊन ५ विकेट घेतल्या. यामुळे कुलदीप यादव ७ स्थानांची झेप घेत ४५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीपची कारकिर्दीतली ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जसप्रीत बुमराह १६व्या क्रमांकावर आणि मोहम्मद शमी २२व्या क्रमांकावर आहेत.


रवींद्र जडेजाला बॉलर आणि ऑल राऊंडरच्या क्रमवारीतही फायदा झाला आहे. बॉलरच्या यादीत जडेजा पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ऑल राऊंडरच्या यादीत जडेजा वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन ४१५ अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. जडेजाच्या खात्यात ३८७ अंक आहेत. 


बॉलरच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन १३व्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा पहिल्या क्रमांकावर आहे. आर. अश्विन नवव्या क्रमांकावर आहे.