क्रिकेट समीक्षक रवि पत्की, मुंबई : सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये कोणी कर्णधार किंवा प्रशिक्षक निवृत्त झाला की त्याच्या नावाने बिलं फाडण्याचा करेक्ट कार्यक्रम सुरू होतो. किंवा निवृत्त झालेले खेळाडू विद्यमान व्यवस्थापना विरुद्ध अन्यायाची हाकाटी पेटवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी ताजी उदाहरणे म्हणजे युवराज, सेहवाग, हरभजन निवृत्त झाल्या झाल्या त्यांनी धोनीला टार्गेट करण्यात आलं. युवराजच्या वतीने तर त्याचे वडील सुद्धा मैदानात उतरले. पार्थिव पटेलने ज्या दिवशी सर्व क्रिकेट बंद करायचा निर्णय घेतला त्या दिवशी कोहलीवर तोंडसुख घेतले. त्याच सिरीयल मधला एक नवा एपिसोड नुकताच अश्विनने लिहून पूर्ण केला. 


अश्विन म्हणाला, "ऑस्ट्रेलियात मी दुखापतग्रस्त असताना सुद्धा 50 षटके टाकली.पण कुलदीप यादवला पाच विकेट्स मिळाल्या म्हणून रवि शास्त्रीने भारताबाहेर कुलदीप आपला सर्वोत्तम स्पिनर आहे असे जाहीर केले. नेदन लायन पोत्याने विकेट्स काढतो तर अश्विन का नाही असा रीमार्क मारला". ह्यावर अश्विन इतका नाराज झाला इतका नाराज झाला की त्याला म्हणे बसच्या खाली चिरडल्या सारखे वाटले.


मानसिक कणखरतेची अवघड परीक्षा घेणाऱ्या क्रिकेटमध्ये इतका मानसिक पंगू पणा पाहून आश्चर्यच वाटले.हे म्हणजे सैन्यातील सैनिकाला परेडला यायला उशीर झाला म्हणून सैन्याच्या कॅप्टन ने त्याला पाच किलोमीटर पळण्याची शिक्षा दिल्यावर लगेच त्या सैनिकाला आर्मी सोडावी असे वाटण्यासारखे आहे. 


अश्विनला वाईट वाटणे साहजीक आहे पण डायरेक्ट बस खाली गेल्यासारखे वाटणे हे जरा अतीच झाले. सेना देशात(SENA-साऊथ आफ्रिका,इंग्लंड,न्यूझीलंड,ऑस्ट्रेलिया) फास्ट बॉलर्स वर मॅचेस जिंकल्या जातात हे खरे असले तरी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी स्पीन्नर्स खराब झालेल्या पिचचा चांगला फायदा उठवतात आणि विजयास मोठा हातभार लावतात.


ग्रॅम स्वान आणि लायन ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. हे दोघे भारतात सुदधा यशस्वी झाले आहेत.भारतीय संघ अश्विनकडे सेना देशात मोक्याच्या कामगिरीची अपेक्षा करत होता.पण तिथल्या duke आणि कुकाबुरा चेंडूशी अश्विनला जुळवून घेता आलेले नाही तसेच overspin च्या तंत्रावरसुद्धा त्याला हुकूमत मिळवता आलेली नाही. 


घरच्या मैदानांवर 300 विकेट्स घेणारा अश्विन सेना देशात अवघ्या 67 विकेट्स घेऊ शकला आहे.त्यात एकदाही पाच विकेट्स घेणं त्याला जमलेले नाही.भारतात 24 वेळा इनिंग मध्ये पाच विकेट्स घेणारा अश्विन श्रीलंकेत 3 वेळा,वेस्ट इंडिज मध्ये दोन वेळा आणि बांगला देशात एक वेळा पाच विकेट्स घेऊ शकला आहे. सेना देशात एकदाही नाही. ज्या प्रमाणे बॅट्समन सेना देशात काय सरासरीने बॅटिंग करतो हे पाहिले जाते त्याप्रमाणे स्पिनरची सेना देशातील कामगिरी भिंगातून पाहिली जाते. 


घरेलू मैदानावर अश्विन सारखा बॉलर नाही.तो ठरवून बॅट्समनला आऊट घेऊ शकतो. इथे त्याचा आत्मविश्वास वेगळाच असतो. इथल्या पीचेसवर तो इस्पिकचा एक्का आहे. त्याची सरासरी,स्ट्राईक रेट थक्क करणारे आहेत. पण त्याच्या सारख्या अत्यंत अभ्यासू आणि चिंतनशील खेळाडूने आपल्या पीचेसवरील कामगिरीवरून आपल्याला बाहेरच्या पीचेसवर सुद्धा उच्च कामगिरीशिवाय ग्रेट म्हणले पाहिजे ही अपेक्षा फारच चुकीची आहे, आणि ते बस खाली जाणे तर अति बालिश.'बस' कर बाबा अश्विन 'बस' कर.