मुंबई : टी20 विश्वचषकानंतर भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदापासून विभक्त होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच विराट कोहली यानं केली. यापुढे आता भारतीय संघाच्या कर्णधारपदी एका नव्या चेहऱ्याची वर्णी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माचं नाव कायम राहणार असल्याचं आता स्पष्ट होतानाच संघाच्या कर्णधारपदी येण्याचं त्याचं स्वप्न मात्र एका खेळाडूमुळं तुटणार असल्याचं कळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 24 व्या वर्षी मोठी जबाबदारी


भारतीय संघातील अवघ्या 24 वर्षांचा हा खेळाडू आहे ऋषभ पंत. जो संघाच्या कर्णधारपदारा प्रबळ दावेदार समजला जात आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच पंतनं आपली वेगळी छाप क्रीडारसिकांच्या मनावर सोडली आहे. ज्यामुळं संघात त्याला भक्कम स्थानही मिळालं आहे. त्याच्यापुढं अद्यापही मोठी कारकिर्द बाकी आहे. अशातच संघाच्या कर्णधारपदी येऊन तो काही किमया करतो का, याचीच उत्सुकता क्रीडारसिकांना लागली आहे.


रोहित शर्मा आता 34 वर्षांचा आहे. तर, विराट 32. येत्या काही वर्षांमध्ये रोहितही संघातून निवृत्तीची घोषणा करु शकतो अशी चिन्हं दर्शवण्यात येत आहेत. ज्यामुळं दीर्घकालीन विचार केल्यास संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचं नाव योग्य नाही. कारण, काही काळानंतर लगेचच संघाला नवा कर्णधार शोधावा लागू शकतो. अशा परिस्थितीत संघाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते.


आयपीएलमध्येही पंतनं दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघाला त्यानं गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचवलं आहे. माहिच्याच कर्णधारपदाचे धडे गिरवत पंत आयपीएलमध्ये त्याचं कसब दाखवताना दिसत आहे. धोनीमधील अनेक गुणांचं अनुकरण करणारा पंत आता संघाची जबाबदारी नेमकी कशी पार पाडेल आणि मुख्य म्हणजे त्याला ही जबाबदारी मिळेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.