दुबई : अखेर यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर चेन्नईने आपलं नाव कोरलं आहे. तर ऑरेंज कॅपचा विजेता शेवटी इंडियन प्रीमियर लीग 2021च्या अंतिम सामन्यात निश्चित झाला. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ऋतुराजने फक्त 2 धावांनी ऑरेंज कॅप जिंकली. ऋतुराज गायकवाडला त्याच्याच संघातील प्लेअर फाफ डु प्लेसिसकडून कडवी झुंज मिळाली. ड्यु प्लेसीने यंदाच्या सीझनने 633 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 635 धावा करून ऑरेंज कॅप काबीज केली.


अंतिम सामन्यात डु प्लेसिसने 59 चेंडूत 86 धावा केल्या आणि तो केवळ 2 धावांनी ऑरेंज कॅप जिंकण्यात चुकला. दुसरीकडे, चेन्नईचा डाव संपल्यानंतर ऋतुराज गायकवाडने हृदयस्पर्शी विधान केलं. त्याच्या या विधानाने सर्वांची मनं जिंकून घेतली. 


ऋतुराज गायकवाड म्हणाला की, "माझी ऑरेंज कॅप जिंकण्याची आपली इच्छा नव्हती. डु प्लेसिसने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारली पाहिजे होती अशी माझी इच्छा होती. डु प्लेसिस शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. जर त्याचा शॉट सिक्स गेला असता तर ऑरेंज कॅप त्याची झाली असती."


ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप जिंकून इतिहास रचला आहे. ऑरेंज कॅप जिंकणारा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. ऋतुराजने केवळ 24 वर्षे, 257 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकली आहे.


गायकवाडने 24 वर्षे 328 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या शॉन मार्शचा विक्रम मोडला. विराट कोहलीने 27 वर्षे 206 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप मिळवली होती. इतकंच नाही तर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जसाठी एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.