Rohan Bopanna Retirement : भारतीय टेनिसचा 'आयर्न मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहन बोपण्णाने 22 वर्षांनी टेनिसला अलविदा केलंय. पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Olympics 2024) मध्ये पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाहेर पडल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. बोपण्णा म्हणाला की, मी भारतासाठी माझा शेवटचा सामना खेळला आहे. त्याला आपली कारकीर्द देशासाठी चांगल्या पद्धतीने संपवायची होती, पण आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठं यश मिळवलं आणि याचा त्याला अभिमान आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिस ऑलिम्पिकच्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या पुरुष दुहेरीच्या जोडीला एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन आणि गेल मॉनफिल्स या फ्रेंच जोडीकडून 5-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. या जोडीच्या पराभवाने भारताचा 1996 पासूनचा टेनिसमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, अनुभवी लिएंडर पेसने अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर मात्र घातलीय. 



बोपण्णा म्हणाला, 'देशासाठी ही निश्चितच माझी शेवटची स्पर्धा होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे मला पूर्णपणे समजलंय. आता जेव्हा मी खेळू शकेन तेव्हा मी टेनिसचा आनंद घेईन. त्याने आधीच डेव्हिस कपमधून निवृत्ती जाहीर केली होती. मी जिथे आहे तो माझ्यासाठी खूप मोठा बोनस आहे. मी दोन दशके भारताचं प्रतिनिधित्व करेन अशी कल्पनाही केली नव्हती. माझी 22 वर्षांची कारकीर्द खूप छान होती.'


पुढे आयर्न मॅन म्हणाला की, 'मी 2002 मध्ये माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि 22 वर्षांनंतरही मला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे. याचा मला खूप अभिमान आहे.  2010 मध्ये ब्राझीलविरुद्धचा पाचवा डेव्हिस चषक सामना हा त्याचा राष्ट्रीय संघासाठी सर्वात संस्मरणीय सामना राहणार आहे. डेव्हिस चषकाच्या इतिहासातील हे निश्चितच एक असल्याचे तो म्हणाला. तो माझा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम क्षण आहे, चेन्नईमधला तो क्षण आणि त्यानंतर बेंगळुरूमध्ये सर्बियाविरुद्धचा सामना 5 सेटमध्ये जिंकणे हेही संस्मरणीय क्षण होते यात शंका नाही.'


टेनिस स्टार म्हणाला, 'त्यावेळी संघातील वातावरण छान होते. ली (लिएंडर पेस) सोबत खेळणे, महेश भूपतीसोबत कर्णधार म्हणून खेळणे हा एक अद्भुत अनुभव होता. त्यावेळी सेमदेव (देववर्मन) आणि मी एकेरी खेळलो आणि आम्ही सर्वांनी मनापासून स्पर्धा केली, हे अविश्वसनीय होते. अर्थात, तुमचं पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जिंकणे आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे ही मोठी उपलब्धी आहे. या प्रवासात खूप त्याग करणाऱ्या माझी पत्नी सुप्रिया हिचा मी ऋणी आहे.'


रोहन बोपण्णा आपल्या ऐतिहासिक टेनिस कारकिर्दीत 6 वेळा दुहेरी स्पर्धेत ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत पोहोचला आहे. याशिवाय त्याला दोन वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनण्याचा मानही मिळाला आहे. 2017 मध्ये बोपण्णाने कॅनडाच्या गॅब्रिएला डब्रोव्स्कीसोबत मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकलं. 2024 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडॉनसह ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावलंय.