Rohit Sharma Hitman Name Story : तारीख होती 2 नोव्हेंबर 2013. बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium, Bangalore) खचाखच भरलं.. बारकी बारकी पोरं सामना पाहण्यासाठी मैदानात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील रोमांचक असा 7 वा सामना खेळला जाणार होता. सामना तसा निर्णायक ठरणार होता. आर या पार.. सामना जिंकणार तो सिरीज जिंकणार असं एकंदरीत समीकरण होतं. पहिलाच फटका भारताला बसला तो टॉसच्या रुपानं. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला रनचेस अवघड जाणार नाही, हे धोनीच काय तर युवराजला देखील माहित होतं. त्यावेळी प्रथम फलंदाजीला आली रोहित अन् शिखरची जोडी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेम्स फॉकनर, कुलटर नाईल, शेन वॉटसन, क्लिन मॅक्ले असे दिग्गज गोलंदाजांची भरती ऑस्ट्रेलियाच्या संघात केली होती. त्यामुळे सामना अटीतटीचा होणार तशी सर्वांची धाकधूक वाढली होती. त्यावेळी मैदानात पाऊल ठेवलं ते रोहित शर्मा याने. सामना महत्त्वाचा असल्याने धोनीने सलामीवीरांना सबुरीने खेळण्याचा सल्ला दिला. मात्र, रोहित ऐकतोय तर खरं ना... पहिल्या 10 ते 20 बॉलचा अंदाज घेतला अन् या पीचवर आपल्याला हाणामारी करायची हे रोहितने पक्कं केलं. 


रोहित शर्माची गाडी सुसाट सुटली. ना फॉकनरला पाहिलं, ना कुलटर नाईलला. फिफ्टी पूर्ण केली आणि भर उन्हात शर्माजी के बेटेने तोडफोड फलंदाजी केली. शतक पूर्ण केलं आणि धोनीने सुटकेचा श्वास घेतला. आतातरी रोहित हळू खेळेल, असं वाटत होतं. पण हा पठ्ठ्या थांबला तर पाहिजे. रोहित शर्मा मैदान मारत होता आणि कॅमेन्ट्री बॉक्समध्ये रवी शास्त्रींचा घसा ओरडू ओरडू कोरडा पडू लागला. रोहित आता 197 धावा करून मैदानात पार रोवून उभा होता, जणू काही बॉल त्याला फुटबॉल सारखा दिसतोय.


आणखी वाचा - Rohit Sharma Birthday: कॅप्टनच्या बर्थडेला MI ने शेअर केला खास Video, 'हिटमॅन' नाव नाही तर...


रोहित अॅट 197... सर्वांचे डोळे रोहितच्या बॅटिंगवर... बॉलरने बॉल टाकला अन् रोहितनं डोळ्याचं पारणं फेडण्याच्या आत बॉल मैदानाबाहेर मारला. खचाखच भरलेलं मैदान टाळ्यांच्या कडकडाटासह उभं राहिलं. रवी शास्त्री यांच्या तोंडून शब्द निघाले "वनडे इंटरनॅशनलमध्ये 200 पूर्ण करण्याची ही कोणती पद्धत आहे, भन्नाट... क्रिकेटला आणखी एक हिटमॅन मिळाला", असं म्हणत रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ऐतिहासिक क्षण साजरा केला. 



दरम्यान, रवी शास्त्री यांनी आपल्या कॅमेंट्रीच्या माध्यमातून रोहित शर्माला एक नवं नाव दिलं. त्यानंतर रोहितला सामनावीर पुरस्कार दिला, तेव्हा तू अगदी हिटमॅन (HITMAN) सारखा खेळला, असं ब्रॉडकास्टर म्हणाले आणि तेव्हापासून सुरू झाली हिटमॅनची कहाणी!