Rohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका
Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली.
Rohit sharma: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. यामधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली. अशातच आता इंग्लंडचे माजी कर्णधार ज्योफ्री बॉयकॉट यांनी रोहित शर्माबाबत मोठं विधान केलं आहे.
डेली टेलीग्राफच्या एका कॉलमध्ये बॉयकॉट यांनी लिहिलंय की, गेल्या 12 वर्षात भारताला त्यांच्याच भूमीवर पराभूत करणारा पहिली टीम बनण्याची सुवर्णसंधी इंग्लंडकडे आहे. टीम इंडियाला विराट कोहलीची उणीव भासतेय. त्यांचा कर्णधार रोहित शर्मा जवळपास 37 वर्षांचा आहे आणि कदाचित आता त्याने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा टप्पा ओलांडला असेल. तो अनेकदा चांगल्या पण छोट्या खेळी खेळतो. चार वर्षांत मायदेशात त्याने केवळ दोन कसोटी शतके झळकावली आहेत.
टीम इंडियाची फिल्डींगही खराब
बॉयकॉट यांनी पुढे लिहिलं की, फिल्डींगमध्येही टीम इंडिया कमकुवत आहे. त्यांनी 110 रन्सच्या स्कोअरवर ऑली पोपचा कॅच सोडला, ज्यामुळे त्यांनी सामनाही गमावला. इंग्लंडने आपल्या स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने भारताला अडचणीत आणलं. 190 रन्सची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाचा पराभव होणं कठीण होतं. घरच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्यासोबत असे कधीच घडले नव्हते, जिथे त्यांना वाटत होते की ते अजिंक्य आहेत.
दुसऱ्या टेस्ट सामन्यात होणार मोठे बदल?
पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 रन्सने पराभव केला. या धक्क्यातून सावरत असतानाच दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी दोन धक्के बसले. रवींद्र जडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झालेत. तर विराट कोहली आणि मोहम्मद शमी याआधीच सिरीजमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे विशाखापट्टणम टेस्टमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
'या' 2 खेळाडूंना मिळू शकते संधी
दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियात युवा फलंदाज सर्फराज खान आणि रजत पाटीदार यांचा डेब्यू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कुलदीप यादवला विशाखापट्टणम टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करु न शकलेल्या मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटीतून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.