Shahbaz Nadeem Announces Retirement : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील (IND vs ENG Test) अखेरच्या सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्पिनर शाहबाज नदीमने (Shahbaz Nadeem) सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट घेणाऱ्या शाहबाज नदीमने निवृत्तीची घोषणा केल्याने आता क्रिडाविश्वास आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तरुणांना क्रिकेटमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवावं, म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचं त्याने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहबाज नदीमने 2004 मध्ये केरळविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्या सामन्यात नदीमने दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यानंतर देखील त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नव्हती. ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नदीमने टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. नदीमने टीम इंडियासाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यात त्याने 4 विकेट्स नावावर केल्या. मात्र, या सिरीजनंतर शाहबाज नदीमच्या कारकीर्दीला ब्रेक लागला.


मी माझ्या निवृत्तीबाबत अनेकवेळा विचार केला. आता मी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा विचार केलाय. मला माहितीये की, मला इथून पुढे टीम इंडियामध्ये संधी मिळणार नाही. मी तरुणांना संधी मिळावी म्हणून पाय मागे घेतोय. आज मी निवृत्ती जाहीर करतोय. जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे, असा खुलासा देखील नदीमने केला आहे. कोणताही निर्णय खूप भावनिक होऊन घेऊ नये, असं मला नेहमीच वाटतं. मी झारखंड संघासोबत 20 वर्षांपासून खेळतोय. मला विश्वास आहे की आम्ही झारखंडचा संघ मजबूत बनवला. आजही झारखंडला कोणीही हलक्यात घेत नाही. आम्ही नक्कीच येत्या काळात ट्रॉफी जिंकू, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला आहे.


दरम्यान, आयपीएलमध्ये शाहबाज नदीमने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांसह एकूण 72 सामने खेळले आहेत. 2018 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 140 सामन्यांमध्ये 28.86 च्या सरासरीने एकूण 542 विकेट्स घेतल्या आहेत.