मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशही यापासून वाचू शकलेले नाहीत. कोरोनाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांमधले सेलिब्रिटी नागरिकांना आर्थिक मदत करत आहेत. यातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सीरिजचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवावी. या सीरिजमधून मिळणारा पैसा कोरोनाशी लढण्यासाठी वापरावा, असं शोएब अख्तर म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची सीरिज २०१२-१३ साली झाली होती. यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात.



'या कठीण परिस्थितीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये ३ वनडे मॅचची सीरिज खेळवण्याचा प्रस्ताव मी ठेवतो. या सीरिजचा निकाल काहीही लागला तरी दोन्ही देशांच्या नागरिकांना अजिबात वाईट वाटणार नाही. विराटने शतक केलं, तर आम्ही खुश होऊ. बाबर आझमने शतक केलं, तर तुम्ही खुश व्हा. दोन्ही टीम विजयी होतील. पहिल्यांदाच दोन्ही देश एकमेकांसाठी खेळतील. या मॅचमधून मिळणारा फंड दोन्ही सरकार समसमान दान करतील. कोरोना व्हायरसच्या महामारीविरुद्धच्या लढाईसाठी हा पैसा वापरला जाऊ शकतो,' असं शोएब म्हणाला.


'सध्या सगळी लोकं घरात बसली आहेत. सध्या ही सीरिज खेळवता येणार नाही, पण गोष्टी सामान्य झाल्यानंतर दुबईसारख्या त्रयस्थ ठिकाणी ही सीरिज खेळवण्यात यावी. दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानांची सोय करावी,' अशी मागणी शोएबने केली आहे.


'दोन्ही देशांमध्ये क्रिकेटलाही यामुळे सुरुवात होऊ शकते. दोन्ही देशांमधले संबंधही सुधारू शकतात. सगळं जग ही सीरिज बघेल, त्यामुळे भरपूर पैसा जमा होईल. या पैशाचा वापर सध्याच्या कठीण काळासाठी केला जाऊ शकतो. या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांची मदत केली पाहिजे. जर भारत आमच्यासाठी १० हजार व्हँटिलेटर बनवू शकतो, तर पाकिस्तान कायम हे लक्षात ठेवेल. आम्ही फक्त मॅचचा प्रस्ताव ठेवू शकतो. काय निर्णय घ्यायचा हे दोन्ही देशांच्या सरकारवर अवलंबून आहे,' अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.