विदर्भाच्या वाघाची इंग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, एकट्यानं घेतल्या १० विकेट
विदर्भाचा फास्ट बॉलर श्रीकांत वाघ यानं इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये १० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
लंडन : विदर्भाचा फास्ट बॉलर श्रीकांत वाघ यानं इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये १० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. २००३-०४ साली श्रीकांत अंडर १९ आशिया कपमध्ये १० विकेट घेण्यापासून मुकला होता. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीकांतनं ९ विकेट घेतल्या होत्या. पण आता श्रीकांतनं या विक्रमाला गवसणी घातली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची प्रिमियर डिव्हिजन लीग नॉर्थशायर अॅण्ड साऊथ डरहम(एनवायएसडी) क्रिकेट लीगच्या मॅचमध्ये स्टोक्सले क्रिकेट क्लबकडून खेळताना वाघनं १० विकेट घेतल्या. वाघच्या हा कामगिरीमुळे स्टोक्सलेचा १३५ रननी विजय झाला. १० विकेट घेण्याबरोबरच वाघनं फक्त २८ बॉलमध्ये ४१ रन केल्या. यामध्ये १ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. वाघनं एनवायएसडीमध्ये ११.४९ ची सरासरी आणि २४.७६ च्या स्ट्राईक रेटनं ३३ विकेट घेतल्या आहेत.
श्रीकांत वाघ बुलडाण्याचा
२९ वर्षांचा श्रीकांत वाघ हा विदर्भाच्या बुलडाण्याचा आहे. ७ वर्षांपूर्वी त्यानं उमेश यादवसोबत विदर्भासाठी शानदार कामगिरी केली होती. मागच्या ५-६ वर्षांपासून श्रीकांत विदर्भासाठी बॉलिंग करतोय. गेल्या काही काळापासून वाघला दुखापतींनी सतावलं आहे. त्यातच ही कामगिरी केल्यामुळे श्रीकांत वाघचा आत्मविश्वास दुणावला असेल.