Shiv Chhatrapati Sports Award : श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचा वाद कधीच थांबताना दिसत नाही. आताही क्रीडा पुरस्काराच्या नव्या नियमावरुन क्रीडा वर्तुळात संतापाची लाट उसळलीय. कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या खेळांना पुरस्कारांमधून वगळण्यात आलंय. पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स-स्नूकर हे चार खेळ ऑलिम्पिकमध्ये नाही. तसंच कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यांचा समावेश नसल्याचे कारण देण्यात आलंय. तर अश्वारोहण, गोल्फ, यॉटिंग हे खेळ ऑलिम्पिकमध्ये आहेत. मात्र राज्यात या खेळांचा प्रसार नसल्याचं कारण पुढे करण्यात आलंय. दुसरीकडे आट्यापाट्या या खेळाला मात्र पुरस्कारात कायम ठेवलंय.आट्यापाट्याला ऑलिम्पिक संघटनेची मान्यता नाही.. तसंच आट्यापाट्या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांची माहितीही कधी समोर येत नाही. तरीही दरवर्षी या खेळात पुरस्कार मिळतो, यावरुनही क्रीडा क्षेत्रात संताप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आलीये. त्यात आता सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आलं आहे. यामध्ये कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे आता वाद पेटण्याची शक्यता आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे? पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स-स्नूकर या चार खेळांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समावेश करण्यात आला नसल्याने असा निर्णय घेण्यात आलाय. त्यावर राज्य क्रीडा मंत्रालयाने स्पष्टकरण दिलंय.


आट्यापाट्या खेळाच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असूनही केवळ पारंपरिक क्रीडा प्रकार म्हणून या खेळाला सामावून घेण्यात आले आहे. मात्र, इतर खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (IOA) मान्यता नसल्याचेही समोर आलंय. राष्ट्रीय स्पर्धा व्हायलाच हव्यात अशी अट नाही. राष्ट्रीय स्तरावरीलही स्पर्धांचे गुण ग्राह्य धरलं जातील असा बचाव करण्यात आला आहे. 


दरम्यान, संघटनांशी कोणतीही चर्चा सरकारने केली नाही. क्रीडा खात्याने केलेला सरकारी मूर्खपणा असल्याचा संतापही संघटनेने व्यक्त केला आहे. क्रीडा खात्याचा हा निर्णय नसून खेळांवर आणि खेळाडूंवर केलेला अन्याय असल्याचं राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अजय खानविलकर यांनी म्हटलंय. तर अन्यायाविरुद्ध आम्ही जोरदार लढा देणार, असा इशारा देखील त्यांनी यावेळी केला. तर आणखी काही खेळांना चाळणी लावण्याचा विचार राज्य क्रीडा खाते करत असल्याचं क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी म्हटलं आहे.