`ऑस्ट्रेलियाच्या चिटींगचे...`, सूर्यकुमारच्या कॅचवर शंका घेणाऱ्यांना गावसकरांनी झापलं! म्हणाले, `त्याच्याकडे..`
Sunil Gavaskar Slams Australi On Suryakumar Yadav T20 World Cup Final Catch: सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवरुन प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गावसकर यावरुन संतापलेत.
Sunil Gavaskar Slams Australi On Suryakumar Yadav T20 World Cup Final Catch: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सूर्यकुमार यादवने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात घेतलेल्या भन्नाट कॅचच्या वैधतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना झापलं आहे. खास करुन ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना गावसकर यांनी फैलावर घेतलं आहे. भारतीय संघाला सामना जिंकून देणारा डेव्हिड मिलरचा कॅच सूर्यकुमारने घेतल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला लागला होता असे दावे केले जात आहे. यावरुनच आता गावसकर चांगलेच संतापलेत.
त्या कॅचने जिंकवली मॅच
टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीच्या जोरावर पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरणार असं वाटत होतं. मात्र त्याने षटकार खेचण्याच्या नादात मारलेला चेंडू सूर्यकुमारने सीमारेषेजवळ अगदी उत्तम पद्धतीने झेलला. चेंडू मैदानात ठेवण्यासाठी सूर्यकुमारने कसरत करत अचूक झेल टीपला. तिसऱ्या पंचांनीही मिलरला बाद घोषित केलं. या विकेटमुळे दक्षिण आफ्रिकेच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही संपल्या आणि भारताने सामना 7 धावांनी जिंकत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला.
वैधतेबद्दल घेतली जातेय शंका
मात्र भारताच्या विजयानंतरही सूर्यकुमारने पकडलेल्या या कॅचचे वेगवेगळ्या अँगलने शूट केलेले व्हिडीओ व्हायरल होत असून कॅचच्या वैधतेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. सूर्यकुमारचा पाय सीमारेषेला लागला होता, सूर्यकुमारच्या पायाने सीमारेषेवरील दोरी हलली होती असे दावे केले गेले. मात्र हा दृष्टीचा भ्रम असून केवळ कॅमेरा अँगलमुळे तसा भास होत असल्याचं स्पष्ट आहे. दुसऱ्या अँगलने पाहिल्यास सूर्यकुमारचा पाय आणि दोरीमध्ये अंतर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सूर्यकुमारने स्वत: याबद्दल स्पष्टीकरण देताना आपला पाय नक्कीच त्या दोरीला लागलेला नाही असं सांगितलं.
नक्की पाहा फोटो >> ₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...
गावसकरांनी ऑस्ट्रेलियन माध्यमांना झापलं
एवढं झाल्यानंतरही सुर्यकुमारच्या या कॅचवर शंका उपस्थित करणाऱ्यांना सुनील गावसकरांनी झापलं आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी त्यांचा संघ मागील काही वर्षांमध्ये कितीवेळा किती वेगवेगळ्या वादांमध्ये अडकला आहे हे आधी पहावं, असा टोला गावसकरांनी लागवला आहे. "ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्येही डेव्हिड मिलरला बाद करताना सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचच्या वैधतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. सर्व उत्तरांमधून हेच दिसून येत आहे की सूर्यकुमारने सीमारेषेजवळ संतुलन राखत अगदी उत्तम कामगिरी केली. सीमेरेषेपलीकडे जाण्याआधी त्याने बॉल हवेत फेकला. मग नंतर हवेत उडी घेत त्याने मैदानात राहूनच उत्तमपद्धतीने झेल पूर्ण केला," असं गावसकर यांनी 'स्पोर्ट्सस्टार'मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'
"कॅचबद्दल कोणीच शंका घेतली नाही. मात्र (ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील) लेखाने यावर शंका घेतली. खरं तर त्या लेखकाने सूर्यकुमार यादवकडे बोट दाखवण्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने मैदानात केलेल्या चिटींगच्या 10 घटनांचा व्हिडीओ पाहिला पाहिजे. हे म्हणजे चुल्हीवरील भांड किटली काळी असल्याचा दावा केल्यासारखा प्रकार आहे," असा सणसणीत टोला गावसकर यांनी लागवला आहे.
भारत भविष्यात अनेक स्पर्धा जिंकेल
भविष्यात भारत इतरही अनेक मोठ्या स्पर्धा जिंकेल असा विश्वासही गावस्कर यांनी आपल्या या लेखात व्यक्त केला आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये केवळ अंतिम सामना पराभूत झाल्याची आठवण गावसकर यांनी करुन दिली आहे.