MI vs SRH : आयपीएलच्या ऐतिहासिक सामन्यात हैदराबादचा दणक्यात विजय, मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव
SRH vs MI, IPL 2024 : सिक्स अन् फोर यांचा पाऊस सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यात पहायला मिळाला. हायस्कोर सामन्यात अखेर सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली अन् 31 विजय मिळवला आहे.
SRH vs MI : स्टेडियममधील प्रेक्षकांच्या माना दुखतील, असा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 31 विजय मिळवला आहे. आयपीएलचे अखेर रेकॉर्ड मोडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी प्रेक्षकांना चांदण्या दाखवल्या. हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर म्हणजेच 277 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सचा डाव 246 धावावर आटोपला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने सलग दुसरा पचवला, तर हैदराबादने विजयाचा नारळ फोडलाय.
हैदराबादने दिलेलं आव्हान म्हणजे मुंबईसाठी डोकेदुखीच होती. मात्र, रोहित शर्माने जबाबदारी खांद्यावर घेतली अन् मुंबईचा गाडा रेटला. रोहितने पहिल्याच ओव्हरपासून हवाई दर्शन सुरू केलं. तर दुसऱ्या बाजूने इशान किशनने चांदण्या दाखवण्यास सुरूवात केली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मुंबईने 50 धावा करत शंख फुंकला. मात्र, इशान किशनची विकेट गेली अन् पुढच्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने रोहितला जाळ्यात फसवलं. सलग दोन विकेट्समुळे मुंबईला ब्रेक लागला. पण तिलक वर्माने सुट्टी दिली नाही. तिलकने बेधुंद हाणामारी सुरू केली पॅट कमिन्सला सामन्यात पहिल्यांदा चिंतेत सोडलं. 14 ओव्हरमध्ये मुंबईने 180 चा आकडा पार केला होता. त्यानंतर मुंबईच्या आशा जिवंत झाल्या होत्या. अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 54 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने मुंबईला पुन्हा कमबॅक करून दिलं. मात्र, त्याला विजय खिशात घातला आला नाही.
मुंबईने दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण स्विकार करून हैदराबादने दमदार सुरूवात केली आहे. ट्रेविस हेडने आक्रमक फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने मयंक अग्रवालची विकेट पडली. अग्रवालने 13 बॉलमध्ये 11 धावा केल्या. हार्दिक पांड्याने पाचव्या ओव्हरमध्ये त्याला तंबूत धाडलं. मात्र, ट्रेविस हेडचा तडाखा सुरूच होता. त्याने 18 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ट्रेविस हेडने आक्रमक खेळी करत अर्धशतक पूर्ण केल्यावर दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माने तलवारीसारखी बॅट चालवली. त्यामुळे हैदराबादने 7 ओव्हरमध्येच 100 धावा पूर्ण केल्या होत्या. ट्रेविस हेडने 24 बॉलमध्ये 62 धावा केल्या. त्यात 9 फोर अन् 3 सिक्सचा समावेश होता. अभिषेक शर्माने 24 मिनिटात ट्रेविस हेडचा रेकॉर्ड मोडला. अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये अर्धशतक ठोकत हैदराबादच्या इतिहासातील सर्वात जलद फिफ्टी ठोकली. अभिषेक शर्मा 23 बॉलमध्ये 63 धावा करून बाद झाला.
हेनरिक क्लासेन क्वेना मफाका, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला एवढंच नाही तर जसप्रीत बुमराहचा देखील समाचार घेतला. हेनरिक क्लासेनने मैदानात षटकारांचा पाऊस पाडला. क्लासेने 34 बॉलमध्ये 80 धावांची खेळी केली. त्यात त्याने 7 सिक्स मारले, तर चार फोर खेचले. क्लासनेच्या या आक्रमक खेळीमुळे हैदराबादला 277 धावा रचता आल्या.
मुंबई इंडियन्स संघ - इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
सनरायझर्स हैदराबाद संघ - ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.