मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. म्हणजेच आता सुरेश रैना (Suresh Raina Retirement) क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. रैनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतरही तो उत्तर प्रदेश संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. आयपीएलच्या मैदानात देखील तो सक्रिय होताच. मात्र मागील आयपीएल 2022 हंगामात रैनाला कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते. त्यामुळेच त्याने आता आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 


ट्विट करत निवृत्तीची घोषणा
सुरेश रैनाने (Suresh Raina) ट्विटमध्ये लिहिले की, 'देश आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी क्रिकेट खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तसेच मी बीसीसीआय, यूपी क्रिकेट असोसिएशन, आयपीएल टीम सीएसके आणि राजीव शुक्ला यांचे आभार मानतो. मला पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांचेही आभार मानतो असे तो ट्विटमध्ये म्हणतोय.  


आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रैनाने 18 कसोटी सामन्यात शतकाच्या जोरावर 768 धावा केल्या. या मधल्या फळीतील फलंदाजाने टीम इंडियासाठी 226 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला. यादरम्यान रैनाने पाच शतकांसह ५६१५ धावा केल्या. त्याचवेळी, 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रैनाच्या नावावर 1605 धावा आहेत.


आयपीएल कारकीर्द
रैनाच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो बराच काळ चेन्नई सुपर किंग्जशी जोडला गेला होता. त्याने लीगमध्ये एकूण 205 सामने खेळले आणि 5528 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि 39 अर्धशतकेही झळकावली.


दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेश रैना आता परदेशी लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. त्याने यूपी क्रिकेट असोसिएशनकडून एनओसी घेतली आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही परदेशी लीगमध्ये खेळला होता. त्यानुसार सुरेश रैना देखील यावर्षी होणाऱ्या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना रैनाच्या या नवीन इनिंगची उत्सुकता लागलीय.