T 20 World cup 2021 : विराट कोहलीसह टीम इंडियातील 2 खेळाडूंना मोठा धक्का
पाकिस्तान विरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहलीसाठी वाईट बातमी
मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट सेनेला मोठा धक्का बसला. 10 विकेट्सने पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा पराभव केला आहे. बाबर आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीनं टीम इंडियाने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. पाकिस्तान टीमला हलक्यात घेणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडलं आहे. इतकच नाही तर त्यानंतर विराट कोहलीलाही मोठा धक्का बसला आहे.
विराट कोहलीसाठी वाईट बातमी आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात सर्वाधिक धावा विराट कोहलीनं केल्या आहेत. त्याने अर्धशतक पूर्ण करत 57 धावा केल्या. इतकं करूनही कोहली मात्र ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत तो एका क्रमांकाने खाली घसरला आहे. विराट आता 725 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.
सलामीवीर केएल राहुलचीही दोन स्थानांनी घसरण झाली आहे. के एल राहुल आठव्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मालाही क्रमवारीत मोठं नुकसान झालं आहे. रोहित शर्मा 24व्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर टी 20 रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी अवघे काही धावा दूर आहे. बाबर आझमने भारत विरुद्ध झालेल्या सामन्यात 52 बॉलमध्ये 68 धावा केल्या होत्या. सध्या इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मालनपेक्षा 11 आकडे दूर आहे. मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
रिझवानने भारत विरुद्ध सामन्यात 55 बॉलमध्ये 79 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्धचा सामना देखील पाकिस्तान टीम 5 विकेट्सने जिंकली आहे. यामध्ये रिझवानने 34 बॉलमध्ये 33 धावा केल्या.