T20 World Cup India vs South Africa: आज सर्व क्रिकेटचाहत्यांचं लक्ष भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याकडे आहे. टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आहेत. एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. दरम्यान भारताने 2011 वर्ल्डकपनंतर एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. दक्षिण आफ्रिका संघ नेहमी मोक्याच्या क्षणी अपयशी ठरत असल्याने चोकर्स म्हणून ओळखला जातो. तर भारतीय संघही 2023 वर्ल्डकपमध्ये अंतिम क्षणी अपयशी ठरल्याने भारतीय चाहत्यांच्या मनात शंकांचा डोंगर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू किर्ती आझाद यांनी भारताने अंतिम सामन्यात नेमकं कशाप्रकारे खेळायला हवं याबाबत आपलं मत मांडलं आहे. "दक्षिण आफ्रिकेची कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची पहिलीच वेळ असल्याने त्यांच्याबद्दल बोलणं तसं कठीण आहे. त्यांना 'चोकर्स' देखील म्हटलं जात होतं कारण ते नेहमी सेमी-फायनल सामन्यात अडकायचे. त्यामुळे ते अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतील याचा अंदाज लावणं तसं कठीण आहे. पण हो ते जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्न करतील आणि भारताला अधिक आत्मसंतुष्ट न होण्याची काळजी घ्यावी लागे. आपण चांगली धावसंख्या उभी करु अशी आशा आहे," असं ते म्हणाले आहेत.


पुढे ते म्हणाले की, "गेल्या वेळी उपांत्य फेरीतील सामन्यांदरम्यान खेळपट्ट्या पाहिल्या तेव्हा चेंडू जास्त उसळत नव्हता आणि खालीच राहत असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल आणि त्यांना चांगले लक्ष्य द्यावे लागेल. दक्षिण आफ्रिकेला चोक करावं लागेल".


टी-20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंजादांचं कंबरडं मोडलं आहे. इंग्लंडविरोधातील सेमी-फायनल सामन्यात त्यांनी 171 धावांचं आव्हान असताना इंग्लंड संघाला 103 धावांमध्ये रोखत गोलंदाजीची कमाल दाखवून दिली होती. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 3 आणि बुमराहने 2 विकेट्स घेतले. 


रोहित शर्मानेही कर्णधारपदाला साजेशी खेळी केली असून वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 248 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. "मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय संघ जसा आहे, ते पाहता आपण चांगली कामगिरी करू आणि विश्वचषक जिंकू. सर्व खेळाडूंनी केलेली कामगिरी अव्वल ठरली आहे, विशेषत: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजी उत्तम आहे. तसंच रोहित ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे ती आपली जमेची बाजू आहे," असंही त्यांनी म्हटलं. 


2022 मध्ये रोहित शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. रोहित कर्णधार झाल्यापासून भारत 2022 टी-20 वर्ल्डकप उपांत्य फेरी, 2023 वर्ल्ड टेस्ट क्रिकेट फायनल आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक अंतिम फेरीत हरला आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकत हा दुष्काळ तो संपवेल अशी आशा आहे. 


"सर्व कर्णधारांनी चांगली कामगिरी केली आहे. जर तुम्ही विराट कोहलीच्या कार्यकाळावर नजर टाकली तर, भारताने त्याच्या कार्यकाळात अनेक मालिका जिंकल्या ज्या त्यांनी यापूर्वी जिंकल्या नव्हत्या. प्रत्येक कर्णधाराची स्वतःची शैली असते, रोहित सध्या कर्णधार आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे. त्याला शुभेच्छा आणि आशा आहे की ते फायनल जिंकतील,” असं माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितलं.