T20 World Cup: भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) विशेष विनंती केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. यासह भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकत आपला दुष्काळ संपवला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने 2013 मध्ये अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने एकही सामना न हारता ट्रॉफी जिंकत नवा रेकॉर्ड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विश्वचषक विजयानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पर्धेतील सहा भारतीय खेळाडूंची निवड केली. ICC XI मध्ये भारतीय कर्णधार रोहित, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश होता. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलेला वेगवान गोलंदाज बुमराहला संपूर्ण स्पर्धेत त्याचा साथीदार अर्शदीपने मदत केली.


पाकिस्तानचा माजी आणि दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने अर्शदीपला सल्ला दिला असून त्याने आता मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं म्हटलं आहे. ""खूप प्रभावशाली, अतिशय प्रतिभावान. त्याच्याकडे स्विंग आणि वेग असल्याने चार दिवसीय क्रिकेटवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करतो आणि नवीन चेंडूही चांगला टाकतो. मला वाटतं की त्याच्यात भारताचा नियमित गोलंदाज होण्याची क्षमता आहे. मला आशा आहे की त्याच्या मनात कसोटी क्रिकेट असेल. कारण तू टी-20 मध्ये पैसे कमावशील आणि एक वर्षात नाव कमावशील,” असं अक्रमने स्पोर्ट्सकीडाला सांगितलं.


अर्शदीप सिंगने टी-20 विश्वचषकातील आघाडीच्या विकेट घेणाऱ्या क्रमवारीत बुमराहच्या पुढे स्थान पटकावले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप हा आयसीसी स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाने नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने टी-20 विश्वचषकात भारतीयाकडून आतापर्यंतची सर्वोत्तम आकडेवारी नोंदवून इतिहासही रचला. टी-20 विश्वचषकात अर्शदीपने भारतीय गोलंदाजाच्या नावे सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवताना, अमेरिकेविरोधात चार विकेट्स मिळवल्या.


वसीम अक्रममने अर्शदीपच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना सांगितलं की, "जर तुम्हाला वारसा सोडायचा असेल, तर तुम्हाला दीर्घ स्वरूपाच्या क्रिकेटचा विचार करावा लागेल. तुमच्या निवृत्तीनंतर 10-20 वर्षांनंतरही लोक तुमच्याबद्दल बोलत असतील की क्रिकेटच्या इतिहासात असा एकही गोलंदाज आलेला नाही. या तरुण गोलंदाजांची अशी मानसिकता असायला हवी. त्याच्याकडे क्षमता आहे. मी त्याला आठ गुण देईन".