भारताने पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी, चीनला होम ग्राउंडवर हरवलं
टीम इंडियाने यजमान चीनला फायनलमध्ये धूळ चारून पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
India Won Asian Championship Trophy 2024 : एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 चा फायनल सामना हा भारत विरुद्ध चीन यांच्यात पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान चीनला धूळ चारून पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे.
भारत आतापर्यंत या टूर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम ठरली, भारतीय खेळाडूंनी यंदा एकूण 26 गोल केले आहेत. भारताने सेमी फायनलमध्ये कोरियाला 4-1 हरवून फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले यासह पॉईंट टेबलमध्ये सुद्धा भारत नंबर 1 वर होता. गतविजेते आणि पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या टीम इंडिया समोर एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये चीनच्या टीमचे आव्हान होते. पहिल्या तीनही क्वार्टरमध्ये टीम इंडियाला चीनच्या बचावावर मात करून गोल करता आला नाही. अखेर जुगराज सिंगने 51 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा : 'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा
भारताने पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी :
टीम इंडियाने आतापर्यंत पाचव्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. पुरुष हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचा पहिला सीजन 2011 मध्ये खेळवला गेला होता. तेव्हा भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये हरवले होते. यानंतर 2013, 2018 आणि 2023 मध्ये सुद्धा विजेतेपद जिंकले होते. 2018 मध्ये विजेतेपद हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले होते. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने यंदाच्या स्पर्धेत एकूण 7 गोल केले.