U19 Women T20 WC: बापाने सगळं विकलं! पोरीने World Cup जिंकून वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं
भारतीय महिला क्रिकेट संघाने अंडर-19 वर्ल्डकप जिंकल्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय महिला संघाने धोनीच्या नेतृत्वातील संघाने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. दरम्यान त्रिशा रेड्डीने हा वर्ल्डकप जिंकत आपल्या वडिलांच्या संघर्षाचं सोनं केलं असून संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
U19 Women T20 WC: दक्षिण आफ्रिकेत भारतीय क्रिकेट संघाने 16 वर्षांनी इतिहास रचला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) जी कामगिरी केली होती, त्याची पुनरावृत्ती शेफाली वर्माने (Shefali Verma) केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप (U-19 World Cup) जिंकत इतिहासात नाव कोरलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच एखादा वर्ल्डकप जिंकला आहे. भारताच्या या विजयात त्रिशा रेड्डीनेही (Trisha Reddy) मोलाची भूमिका बजावली. त्रिशाने अंतिम सामन्यात सर्वाधिक 24 धावा केल्या आणि तिसऱ्या विकेटसाठी सौम्या तिवारीसह मिळून 46 धावांची भागीदारी केली.
त्रिशा रेड्डीच्या यशात तिच्या वडिलांचं मोठं योगदान आहे. मुलीला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. जिम चालवण्यासह ते हॉटेलमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत होते. पण मुलीला क्रिकेट खेळता यावं यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली, तसंच अर्ध्या किंमतीत जीमही विकून टाकली. इतकंच नाही तर ते कुटुंबासह सिकंदराबाद येथे शिफ्ट झाले. मुलीला क्रिकेट प्रशिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी त्यांनी आपली जमीनही विकून टाकली. वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या या संघर्षाचं त्रिशा रेड्डीने वर्ल्डकप जिंकत सोनं केलं आहे.
त्रिशाच्या वडिलांनी मुलीला क्रिकेटर बनवण्यासाठी जमीन विकली
त्रिशाच्या वडिलांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की "आपल्या फिटनेस व्यवसाय आणि नोकरीवर लक्ष केंद्रीत करण्याआधी मी राज्यस्तरीय अंडर 16 संघाकडून हॉकी खेळलो होतो. मी हॉकीसह क्रिकेटही खेळायचो. माझ्यानंतर मुलांनीही क्रिकेट खेळावं अशी इच्छा होती. याच कारणामुळे मी मुलीला भद्राचलम येथून सिकंदराबाद शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. मला बाजारमूल्याच्या अर्ध्या किंमतीत माझी जीम नातेवाईकाला विकावी लागली. यानंतर मी मुलीच्या प्रशिक्षणासाठी चार एकर जमीन विकली. मुलीला वर्ल्डकप जिंकण्यात मदत करताना पाहणं तिच्या कष्टाचं चीज आहे. असा विजय पाहण्यासाठी मी कोणतंही नुकसान सहन करु शकतो".
लहानपणी टीव्हीवर कार्टूनऐवजी क्रिकेट पाहायची
वडिलांनी लहानपणापासूनच त्रिशाला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यामुळेच मी माझ्या पत्नीला मुलीला टीव्हीवर कार्टूनऐवजी क्रिकेट दाखवण्यास सांगितलं होतं. जुन्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणाले की "जेव्हा त्रिशाचा जन्म झाला तेव्हा मी पत्नीला सांगितलं की, जेव्हा ती टीव्ही पाहण्यास सुरुवात करेल तेव्हा आपण तिला कार्टूनऐवजी क्रिकेट दाखवायचं. ती अडीच वर्षांची असताना मी तिच्यासाठी प्लास्टिकची बॅट आणि बॉल आणत क्रिकेट खेळणं शिकवण्यास सुरुवात केली होती. ती पाच वर्षांची असताना मी तिला जीममध्ये घेऊन जायचो आणि 300 चेंडूंचा सराव करुन घ्यायचो. यानंतर मी स्थानिक क्रिकेट मैदानावर सीमेंटचं पीच बनवलं. नोकरी आणि जीममधून जो वेळ मिळायचा तो मी त्रिशासह मैदानावर घालवायचो".
त्रिशाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न
वडिलांनी घेतलेल्या या मेहनतीचा फायदा झाला आणि सिकंदराबाद शिफ्ट झाल्यानंतर दोन वर्षातच त्रिशा हैदराबादच्या अंडर-16 टीममधून खेळू लागली. तिने 2014-15 मध्ये अंडर 19 आणि नंतर अंडर-23 संघात स्थान मिळवलं. यानंतर भारतीय संघात प्रवेश आणि आता अंडर-19 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी करत त्रिशाने फक्त वडिलांचं नाही तर संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केलं आहे.