U-19 World Cup: या चुकीमुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं
अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला आहे.
पॉचफेस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला आहे. बांगलादेशची अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढच नाही तर बांगलादेशने पहिल्यांदाच एखादी आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. बांगलादेशच्या वरिष्ठ खेळाडूंनाही अजूनपर्यंत ही कामगिरी करता आली नाही. बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करुन हा सामना जिंकला असला, तरी भारतीय खेळाडूंनी केलेल्या चुकांचा फायदाही बांगलादेशला तितकाच झाला.
बांगलादेशला १७८ रनचं आव्हान दिलेलं असताना भारतीय बॉलरनी जास्तच्या तब्बल ३३ रन दिल्या. यात १९ वाईड, २ नो बॉल, ८ बाईज आणि ४ लेग बाईजचा समावेश होता. फक्त वाईड आणि नो बॉलवरच लक्ष दिलं तर भारताला २१ बॉल जास्त टाकावे लागलेच, याचसोबत २१ रनही जास्त गेल्या.
भारताकडून कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर आणि आकाश सिंगने प्रत्येकी ५-५ वाईड बॉल टाकले. तर सुशांत मिश्राने ४ वाईड आणि २ नो बॉल टाकले. माफक आव्हान थोपावत असताना भारताला ही चूक चांगलीच महागात पडली. परिणामी पाचव्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं.
बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी, भारताला हरवून वर्ल्ड कपवर कब्जा