U-19 World Cup:बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी, भारताला हरवून वर्ल्ड कपवर कब्जा

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Updated: Feb 9, 2020, 09:57 PM IST
U-19 World Cup:बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी, भारताला हरवून वर्ल्ड कपवर कब्जा title=

पॉचफेस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव करुन पहिल्यांदाच अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. आयसीसीची एखादी स्पर्धा जिंकायची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. भारताने ठेवलेल्या १७८ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. परवेझ हुसेन इमॉन आणि तनझीद हसन यांच्यात ५० रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली.

५० रनच्या ओपनिंग पार्टनरशीपनंतर मात्र भारताने मॅचमध्ये जोरदार पुनरागमन केलं. बांगलादेशची अवस्था ८५ रनवर ५ विकेट अशी झाली. लेग स्पिनर रवी बिष्णोईने बांगलादेशच्या सुरुवातीच्या ४ बॅट्समनना माघारी पाठवलं. सुशांत मिश्राला २ आणि यशस्वी जयस्वालला १ विकेट मिळाली.

बांगलादेशकडून परवेझ हुसेन इमॉनने सर्वाधिक ४७ रन केल्या, तर कर्णधार अकबर अलीने संघर्ष करत नाबाद ४३ रन करुन बांगलादेशला जिंकवून दिलं. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करत असताना पावसामुळे व्यत्यय आला, त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी ४६ ओव्हरमध्ये १७० रनचं आव्हान मिळालं.

बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या बॉलरनी अकबर अलीचा हा निर्णय योग्य ठरवला. बांगलादेशच्या अचूक माऱ्यासमोर भारताची सुरुवात अत्यंत धीमी झाली.

४७.२ ओव्हरमध्ये भारताचा १७७ रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून ओपनर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८८ रनची खेळी केली. तर टिळक वर्माने ३८ आणि ध्रुव जुएलने २२ रन केले. हे तीन भारतीय वगळता इतर कोणालाही दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. बांगलादेशकडून अविशेक दासने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शोरीफूल इस्लाम, तनझीम हसन सकीब यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. रकीबूल हसनला एक विकेट घेण्याय यश आलं.

२०१८ साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. यंदा मात्र प्रियम गर्गच्या टीमला वर्ल्ड कपची ही ट्रॉफी वाचवता आली नाही. भारतीय टीमने आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारत अंडर-१९ वर्ल्ड कप चॅम्पियन बनला होता.