Video: ऋषभ पंतकडून ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचं स्लेजिंग
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं आहे.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलरनी जोरदार पुनरागमन केलं आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं ७ विकेट गमावून १९१ रन केले होते. दिवसाअखेर ट्रेव्हिस हेड ६१ रनवर नाबाद आणि मिचेल स्टार्क ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून आर.अश्विनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्धशतक करणारा ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे.
पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचं स्लेजिंग करताना दिसला. सगळेच जण पुजारा नसतात, असं ऋषभ पंत ख्वाजाला म्हणाला. ऋषभ पंतचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. याआधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून अनेकवेळा मैदानात स्लेजिंग केल्याचे प्रकार क्रिकेट रसिकांनी पाहिले आहेत. यावेळी मात्र भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे.
उस्मान ख्वाजासाठी डीआरएस वापरण्यासाठीही ऋषभ पंतनंच विराटची मदत केली. उस्मान ख्वाजाच्या बॅटला बॉल लागल्याचा पंतला विश्वास होता, पण अंपायर कुमार धर्मसेना यांनी आऊट दिलं नाही. अखेर पंतनं कर्णधार विराट कोहलीला डीआरएस घ्यायला लावला. डीआरएसमध्ये उस्मान ख्वाजाच्या हाताला बॉल लागल्याचं दिसल्यामुळे त्याला आऊट देण्यात आलं. १२५ बॉलमध्ये २८ रन करून ख्वाजा आऊट झाला.
ऋषभ पंतचा अश्विनलाही सल्ला
एवढच नाही तर ऋषभ पंत विकेट कीपिंग करत असताना अश्विनलाही सल्ला देत होता. ट्रेव्हिस हेड बॅटिंग करत असताना पंतनं अश्विनला शॉर्ट बॉलिंग करु नकोस असं सांगितलं. शॉर्ट बॉल टाकू नकोस, तो शॉर्ट बॉलचीच वाट पाहतोय, असं तो म्हणाला. ऋषभ पंतचा हा आवाजही मायक्रोफोनमध्ये कैद झाला.