ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक केलं. विराटचं शतक आणि धोनीच्या अर्धशतकामुळे भारतानं ही वनडे जिंकत सीरिजमध्ये पुनरागमन केलं. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३९वं शतक होतं. १०८ बॉलमध्ये विराट कोहलीनं १०४ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. या शतकाबरोबरच विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६४ शतकं झाली आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यानं विराट कोहलीच्या शतकांबाबत भविष्यवाणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीसारखं सातत्य फार कमी खेळाडूंमध्ये असतं. जर तो फिट राहिला आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, तर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं सहज पूर्ण करेल, असं मोहम्मद अजहरुद्दीन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला. जगातल्या इतर खेळाडूंपेक्षा कोहलीचं सातत्य चांगलं असल्याची प्रतिक्रियाही मोहम्मद अजहरुद्दीन यांनी दिली.


दुसऱ्या वनडेमध्ये कोहलीच्या शतकापेक्षा धोनीचं पुन्हा फॉर्ममध्ये येणं भारतासाठी दिलासादायक होतं. या मॅचमध्ये धोनीनं ५४ बॉलमध्ये नाबाद ५५ रनची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून धोनीनं भारताला विजयाजवळ नेलं आणि एक रन काढून सामना जिंकून दिला. या मॅचमध्ये भारताचा ६ विकेट आणि ४ बॉल राखून विजय झाला. धोनीच्या खेळीमध्ये २ सिक्सचा समावेश होता.


धोनीच्या या कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहलीनंही त्याचं कौतुक केलं आहे. धोनी हा भारतीय टीमचा हिस्सा आहे, याबद्दल कोणतीही शंका नको. आजचा दिवस हा धोनीचा होता. त्यानं मॅच शेवटपर्यंत नेली आणि तेव्हा मॅच कशी संपवायची हे धोनीला माहिती असतं. त्या क्षणी धोनीच्या मनात काय चाललं असतं, हे फक्त त्यालाच माहिती असतं. शेवटच्या क्षणी सिक्स मारण्यात त्याचा स्वत:वर विश्वास आहे, असं कोहली म्हणाला.


दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतानं ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये १-१नं बरोबरी केली आहे. आता तिसरी आणि निर्णायक वनडे शुक्रवारी १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होईल. पहिल्या वनडेमध्ये भारताचा ३४ रननी पराभव झाला होता. त्या मॅचमध्ये रोहित शर्मानं शतक केलं होतं.


१० वर्षानंतरही धोनीचा तोच करिश्मा कायम, आयसीसीकडूनही कौतुक