मुंबई : विराट कोहली, धोनी यांसारखे आघाडीचे क्रिकेटपटू जाहिराती करताना दिसले नाही तर नवलच. या जाहिराती क्रिकेटपटूंना पैसा, फेम मिळवून देतात. भारताचा कर्णधार विराट कोहली अनेक जाहिरातींमध्ये झळकतो. परंतु, एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीकडून आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर कोहलीने नाकारल्याचे वृत्त आहे. 'द हिंदू' या वर्तमानपत्राने यासंदर्भात माहिती दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॉफ्ट ड्रिंक्स मी स्वतः घेत नसल्याने त्याची जाहिरात करणे मला योग्य वाटत नाही. फक्त कोट्यवधी रुपये मिळणार म्हणून मी जे स्वतः टाळत आलोय त्याची जाहिरात करणे, मला कधीही पटणार नाही, असे कोहली म्हणाला. कोहली आपल्या फिटनेसबद्दल अत्यंत जागरूक असून त्यासाठी तो नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतो. 


लहानपणी मला सॉफ्ट ड्रिंकसाठी खूप आवडत असे. मात्र, जेव्हा तुम्ही आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता, तेव्हा फिटनेसच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंक घेणं योग्य नाही. कोणत्याही क्रीडा अकादमीच्या कँटीनमध्ये खेळाडूंना सॉफ्ट ड्रिंक दिलं जात नाही, असे सांगत कोहलीने ही जाहिरात नाकारण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.


यापूर्वी देखील भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांची जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडू काही प्रमाणात सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिराती करतात. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं कोहलीने म्हटलंय. मात्र, मी जेव्हा कधीही या खेळाडूंना भेटतो, त्यावेळी त्यांना सॉफ्ट ड्रिंक न घेण्याचा सल्ला देतो.