साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (World Test Championship 2021 ) विजेतेपदासाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand Wtc Final 2021) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आता काही दिवसच राहिले आहेत. क्रिकेट चाहत्यांसह खेळाडूंनाही उत्सुकता लागून राहिलेली आहे. अटीतटीचा आणि महत्वाचा सामना असल्याने दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. हा अंतिम सामना साऊथम्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. (virat kohli will break mahendra singh dhoni record played most Test matches as captain against new zealand in world test championship final 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. विराट या सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच किर्तीमान रचणार आहे. विराट महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) पछाडत टीम इंडियाकडून सर्वाधिक सामन्यात कॅप्टन्सी करणारा (Most Matches As Captain) खेळाडू ठरणार आहे. सध्या धोनी आणि विराट नेतृत्वाबाबत 60 सामन्यांसह बरोबरीवर आहेत. 


कोहलीला हा विक्रम नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान करण्याची संधी होती. पण, विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून पहिल्या सामन्यानंतर माघार घेतली होती. तेव्हा विराटच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार होते. त्यामुळे विराटने कांगारु विरुद्धच्या अखेरच्या 3 कसोटीतून माघार घेतली होती.


विराटच्या कॅप्टन्सीचा  रेकॉर्ड


विराट 2014 पासून टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सांभळतोय. विराटने तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच 8 वर्षांमध्ये 60 कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. 


विराटने 60 पैकी 36 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. तर 14 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. उर्वरित 10 सामने अनिर्णित राखण्यात यश आले आहे. विराट टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे. विराटनंतर धोनीने सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. धोनीने 60 पैकी 27 सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.   


यशस्वी कर्णधारांमध्ये विराट पाचव्या क्रमांकावर  


ताज्या आकडेवारीनुसार विराट यशस्वी कर्णधारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. स्मिथने 109 पैकी 53 सामन्यांमध्ये आफ्रिकेला विजय मिळवून दिला आहे. 


त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ आहेत. पॉन्टिंगने 48 तर वॉने 41 कसोटींमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तर यानंतर वेस्टइंडीजचे दिग्गज खेळाडू क्लाइव्ह लॉइड यांनी 74 पैकी 36 सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे.   


लॉइड यांना पछाडण्याची संधी 


विराटला लॉइड यांना पछाडण्याची संधी आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात केल्यास, विराट चौथा यशस्वी कर्णधार ठरेल. त्यामुळे विराट न्यूझीलंड विरुद्ध कर्णधार आणि फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.