लेकीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
विराट कोहलीची मुलगी वामिका हिची पहिली झलक कालच्या सामन्यादरम्यान पहायला मिळाली. हा फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र आता या व्हायरल झालेल्या फोटोनंतर विराटने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला. मात्र या सामन्यात विराट कोहलीचे फॅन्स मात्र खूश होते. माजी कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिका हिची पहिली झलक या सामन्यादरम्यान पहायला मिळाली. हा फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या व्हायरल झालेल्या फोटोनंतर विराटने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये कोहली म्हणतो, "माझ्या मुलीचा काल स्टेडियममध्ये फोटो क्लिक करण्यात आला. आणि हा फोटो आता सोशल मीडियावर चांगला व्हायरस होतोय. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यावेळी आम्हाला ऑफ गार्ड पकडण्यात आलं. त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं की कॅमेराची आमच्यावर नजर आहे."
विराट कोहली पुढे म्हणाला की, मुलीचा फोटो काढण्याबाबत आमची भूमिका पहिल्यासारखीच आहे. आम्ही आशा करू, तुम्ही वामिकाचे फोटो क्लिक किंवा प्रिंट करणार नाही. यामागील कारण मी आधीच सांगितलं आहे, धन्यवाद.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमी आणि विराटच्या चाहत्यांना एक गोड बातमी मिळाली. सामना सुरु असताना चक्क विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका दिसली. लाईव्ह मॅचचं प्रक्षेपण सुरू असताना त्याचवेळी कॅमेऱ्यामनची नजर अनुष्कावर गेली. अनुष्काच्या कडेवर लहान मुलगी दिसत आहे. ती वामिका असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान अनुष्का किंवा विराटने मात्र वामिकाचा चेहरा दिसणारा एकही फोटो अजून सोशल मीडियावर शेअर केला नाही. अनुष्काच्याकडेवर वामिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. वामिकाला पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.