Australia vs West Indies 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्या कोऱ्या वेस्ट इंडिजने तगड्या ऑस्ट्रेलियाचा गाबाच्या मैदानावर घमंड मोडला आहे. तब्बल 27 वर्षानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट विजय मिळवता आलाय. वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला 24 वर्षांचा शमर जोसेफ (Shamar Joseph)... कांगारूंनी अंगठा मोडला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला अन् ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या. 10 ओव्हरचा खतरनाक स्पेल टाकत शमरने 7 गड्यांना परतीचा मार्ग दाखवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्यूरिटी गार्डची नोकरी सोडली


शमरला क्रिकेटची लहानपणापासून आवड होती. पण घरात आठराविश्व दारिद्रय... शमर जोसेफ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1999 रोजी गयानामधील बाराकारा या छोट्या गावात झाला. जोसेफला तीन बहिणी आणि पाच भाऊ... क्रिकेट पाहण्यात आणि क्रिकेट खेळण्यात त्याचं बालपण गेलं. गरिबीमुळे त्याला नोकरी करावी लागली. मोठ्या भावांनी देखील हातभार लागला. पण काही वर्षांनी त्यांनी बराकारा येथून स्थलांतरित होऊन न्यू ॲमस्टरडॅमला जाण्याचा निर्णय घेतला. कुटूंब मोठं असल्याने त्याने सेक्युरिटी गार्डची नोकरी हाताशी धरली. 12 तास सेक्युरिटी गार्डची नोकरी करायची अन् त्यानंतर क्रिकेट खेळायचं, असा त्याचा नित्यनियम होता.


देशासाठी क्रिकेट खेळण्याची त्याचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याने अखेर नोकरी सोडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. दररोज मेहनत घेतली. जोसेफची ओळख त्याच्या शेजारी रोमारियो शेफर्डने गयाना क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक एसुआन क्रँडन यांच्याशी करून दिली अन् शमरचं नशिब पालटलं. जोसेफला कर्टली ॲम्ब्रोसद्वारे चालवलेल्या वेगवान गोलंदाजी क्लिनिकमध्ये जाण्याची संधी देखील मिळाली. जोसेफ फेब्रुवारी 2023 मध्ये वेस्ट इंडीज चॅम्पियनशिप सामन्यात गयानासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केलं.


कॅरिबियन प्रीमियर लीगच्या 2023 हंगामात जोसेफला गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघात जखमी कीमो पॉलच्या बदली म्हणून बोलावण्यात आलं अन् शमरने संधीचं सोनं केलं. 150 च्या स्पीडने शमरने दांड्या गुल केल्या. त्यामुळे सिलेक्टर्च्या नजरेत हा 24 वर्षांचा तगडा गोलंदाज बसला. अखेर जोसेफने 17 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीत वेस्ट इंडिजकडून कसोटी पदार्पण केलं. कसोटी क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर त्याला स्टिवन स्मिथची विकेट मिळाली. 



दरम्यान, वेस्ट इंडिजचा डाव सुरू असताना शमर फलंदाजीसाठी आला, तेव्हा पॅट कमिन्सचा एक बॉल त्याच्या अंगठ्याला लागला. त्यामुळे त्याला मैदानातून उचलून बाहेर घेऊन जावं लागलं होतं. मात्र, त्यानंतर त्याने मैदानात पुन्हा उतरण्याचा निश्चय केला. 18 तासात रिकव्हरी करत त्याने पुन्हा मैदानात आला अन् 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याच्या या गोलंदाजीने वेस्ट इंडिजचे अनेक रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत.