मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या आरक्षित खेळाडूमध्ये आणखी एका भारतीय खेळाडूची वाढ झाली आहे. भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्माला वर्ल्ड कपसाठी आरक्षित खेळाडू ठेवण्यात आलेलं आहे. ईशांत शर्मा आपल्या कारकीर्दीमध्ये कधीही वर्ल्ड कप खेळलेला नाही. यावेळेच्या वर्ल्ड कपमध्येही त्याची निवड झालेली नाही. मात्र यावेळी त्याला आरक्षित खेळाडू म्हणून तयार राहायला सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नवदीप सैनी याला पहिला आरक्षित खेळाडू म्हणून संधी मिळेल त्यानंतर ईशांतचा विचार केला जाईल, अशी माहिती बीसीसीआच्या सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय टीममधल्या एखाद्या बॉलरला दुखापत झाली तर नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा यांना संधी मिळेल. ईशांतनं यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना १० सामन्यांमध्ये २९.१० च्या सरासरीने १० विकेट घेतल्या आहेत.


खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर हे फास्ट बॉलर देखील भारतीय टीमसोबत इंग्लंडला जाणार आहेत. हे तिन्ही बॉलर भारतीय बॅट्समनना सराव देणार आहेत, पण ते आरक्षित फास्ट बॉलर नाहीत. एखादा बॉलर दुखापतग्रस्त झाल्यास भारतीय टीमला वाटलं तर या तिघांपैकी एकाची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण पहिलं प्राधान्य नवदीप सैनी आणि मग ईशांत शर्माला देण्यात येईल.


नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा हे आरक्षित बॉलर म्हणून तर अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत हे आरक्षित बॅट्समन असतील. बॅट्समनना दुखापत झाली, तर या दोघांपैकी एकाला संधी देण्यात येईल. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचदरम्यान केदार जाधवला दुखापत झाली आहे. केदार जाधवची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण जर केदार वेळेत फिट झाला नाही, तर रायुडू किंवा पंतला संधी मिळेल.


३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 


भारतीय टीम 


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर