मुंबई : यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे. रविवारी १६ जूनला हा सामना रंगणार आहे. पण या मॅचची जाहिरात करताना पाकिस्तानमधील चॅनल जॅझ यांनी पातळी सोडली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची जाहिरात करताना जॅझ टीव्हीने विंग कमांडर अभिनंदन यांचा आधार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅझ टीव्हीने या जाहिरातीत अभिनेत्याला अभिनंदनसारखी मिशी लावून भारतावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. या जाहिरातीनंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी ट्विटवरून पाकिस्तानवर टीका केली आहे.



'ही क्रिकेट मॅच आहे, त्याला क्रिकेट मॅचच राहून द्या. या गोष्टी लाजीरवाण्या आहेत.' 'पाकिस्तानची ही जाहिरात वर्णभेदी आहे.' 'पाकिस्तानकडून भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना ट्रोल करण्यात येत आहे. धोनीच्या ग्लोव्हजवर भूमिका घेणारी आयसीसी आता काय करणार?' अशा टीका ट्विटरवरून करण्यात येत आहेत.



भारत आणि पाकिस्तान मॅचआधी नेहमीच भारताकडून मौका-मौका या जाहिराती बनवण्यात येत असतात. यावेळीही स्टार स्पोर्ट्सने अशीच जाहिरात बनवली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १६ जूनला मॅच होणार आहे. त्यातच १६ जून हा फादर्स डे आहे, त्यामुळे फादर्स डेचं औचित्य साधून ही जाहिरात बनवण्यात आली आहे. या जाहिरातीत एक जण पाकिस्तानची जर्सी घालून, एक जण बांगलादेशची जर्सी घालून आणि एक जण टीम इंडियाची जर्सी घालून दाखवण्यात आला आहे. 


भारताच्या मौका-मौका या जाहिरातीला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या जॅझ टीव्हीने विंग कमांडर अभिनंदन यांचा आधार घेत आपली पातळी सोडली.