`...तर बाबरची कामगिरी सुधारेल`; दिग्गज खेळाडूचा सल्ला! म्हणाला, `विराटने केलं तेच कर`
Sensational Virat Kohli Advice For Babar Azam: अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानी संघाचा 8 विकेट्स राखून पराभव केल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर टीका केली जात असून त्याने कर्णधारपद सोडावं अशी मागणी होत आहे.
Sensational Virat Kohli Advice For Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर चहू बाजूंनी टीका होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. वर्ल्ड कप 2023 पूर्वी तुफान फॉर्ममध्ये असलेल्या बाबरला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेत सातत्याने अपयश येत आहे. मात्र केवळ फलंदाजी नाही तर बाबरचं नेतृत्वावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. बाबरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांपासून काही माजी क्रिकेटपटूही करताना दिसत आहे. असं असतानाच आता अनेकदा विराट कोहलीशी तुलना केल्या जाणाऱ्या बाबर आझमने विराटने केलं तोच मार्ग निवडावा असा सल्ला एका माजी क्रिकेटपटूने दिला आहे. विराटला सध्या ज्या पद्धीतने खेळतोय त्यामागे त्याचा एक निर्णय कारणीभूत ठरल्याचा हवाला देत बाबरनेही हाच मार्ग अवलंबल्यास त्याला नक्कीच यश मिळेल असा दावा या खेळाडूने केला आहे.
बाबर आझमची सुमार कामगिरी
बाबरने अफगाणिस्तानविरुद्ध 72 धावांची खेळी केली. मात्र बाबरची ही फारच संथ होती कारण यासाठी त्याने 92 बॉल खर्च केले. बाबर आझम वर्ल्ड कप पूर्वीच्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करताना दिसला. मात्र वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमला भारत वगळता कोणत्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात बाबर 18 बॉलमध्ये 5 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या सामन्यात बाबर 15 बॉलमध्ये 10 धावा करुन तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये 18 धावा करुन बाद झाला. भारताविरुद्ध बाबरने अर्धशतक झळकावत 58 बॉलमध्ये 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 350 हून अधिक धावांचा पाठलाग करताना 2 विकेट्स गेलेल्या असताना बाबर एक बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला. असाच काहीसा प्रकार बाबरने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सेट झाल्यानंतर 41 व्या ओव्हरला आपली विकेट फेकत केला आणि पाकिस्तानी संघ अडचणीत आला.
विराटच्या कोणत्या निर्णयाचा संदर्भ कोणी दिला?
पाकिस्तानचा माजी फलंदाज बसित अली यांनी बाबरच्या कर्णधारपदावर टीका केली आहे. अफगाणिस्तानी संघाने पकिस्तानचा धक्कादायक पराभव केल्याने बसित अली यांनी संताप व्यक्त केला आहे. बसित अलीने वर्षभरापूर्वीच आपण बाबर आझमच्या नेतृत्वाबद्दल विधान केल्याची आठवणही चाहत्यांना करुन दिली आहे. "मी एका वर्षापूर्वी माझ्या चॅनेलवर बोललो होतो की, बाबर आझम हा उत्तम फलंदाज आहे. मात्र त्याने कर्णधारपद सोडावं ज्याप्रमाणे विराट कोहलीने केलं तसाच निर्णय त्याने घ्यावा. विराट कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतरची त्याची कामगिरी पाहा. बाबरनेही कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची कामगिरी नक्कीच सुधारेल यात शंका नाही," असं बशित अलीने 'एआरवाय न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मला देशद्रोही म्हणाले
"मात्र सोशल मीडियावर काही लोक शब्द फिरवून सांगतात. त्यांनी मला बाबर आझम आवडत नाही आणि मी देशद्रोही आहे असा अपप्रचार माझ्या टीकेनंतर केला," असंही बशित अलीने म्हटलं आहे.