श्रीलंकेविरुद्ध निळी पट्टी घालून मैदानात उतरला भारतीय संघ; कारण जाणून प्रत्येकाला वाटेल अभिमान
IND vs SL : वानखडेवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघ निळ्या तर श्रीलंकेचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 चा (World Cup) 33वा सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (wankhede stadium) दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. भारतीय संघ सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या सामन्यात पाकिस्तानकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू हातावर निळ्या रंगाची (Blue Band) पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. पण या पट्टीचा नेमका अर्थ काय अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.
वर्ल्डकपदरम्यान, जगभरात बालकांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल निधीद्वारे (UNICEF) वन डे 4 चिल्ड्रन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. क्रिकेट फॉर गुड (Cricket4Good) हा आयसीसीचा जागतिक स्तरावर पोहोचण्याचा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश मुलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. मुलांना चांगले अन्न आणि आरोग्य सेवा पुरविल्या पाहिजेत, असा या कार्यक्रमाचा उद्देष आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये पुणे आणि मुंबईतील 100 हून अधिक मुलांनी भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांच्या खेळाडूंची भेट घेतली आहे. त्यामुळे बालहक्कांसाठी भारतीय खेळाडूंनी निळ्या पट्ट्या घालून मैदानात प्रवेश केला होता.
युएनआयसीईएफ आणि आयसीसीचा ब्रँड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर आणि मुरलीधरन यांच्यासह इतर दिग्गज खेळाडूंनी वन डे 4 चिल्ड्रन कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता. याबाबात बोलताना सचिन म्हणाला की, मुलांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे हे माझे भाग्य आहे. खेळासोबतच सामाजिक कार्य करणे हे माझे भाग्य समजतो.
दुसरीकडे, श्रीलंका क्रिकेट संघाचे समर्थक पर्सी अबेसेकेरा यांचे सोमवारी कोलंबो येथे दीर्घ आजारपणानंतर निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधून भारताविरुद्ध मैदानात प्रवेश केला आहे.
दरम्यान, या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला दिलशान मदुशंकाने बोल्ड केले. शुभमन गिल आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. मात्र दोघांनाही त्यांचे शतक पूर्ण करता आले नाही. गिलने 92 चेंडूत 92 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. मदुशंकाने श्रीलंकेला तिसरे यश मिळवून दिले आहे. त्याने विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवले. कोहलीचा 49 वा क्रमांक हुकला. कोहलीने 32 व्या षटकात पथुम निसांकाला झेलबाद केले. त्याने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली.