`मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,` विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, `मोहम्मद शामी...`
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली असून, सेमी-फायनलच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु आहे. भारताने आपले पहिले पाचही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. पहिल्या पाच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान अशा तगड्या संघांना धूळ चारत आपण प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने भविष्यवाणी केली आहे. यादरम्यान त्याने काही मोठी विधानं केली आहेत.
शोएब अख्तरने भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करताना काही मोठी विधानं केली आहेत. न्यूझीलंड संघाचा पराभव करण्यासाठी शुभमन गिल, के एल राहुल, रोहित शर्मा हे एकटेही पुरेसं असल्याचा दावा त्याने केला आहे. न्यूझीलंड संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने 95 धावा करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शोएब अख्तरने विराट कोहलीचं कौतुक करताना दबावात तो फार चांगला खेळतो असं म्हटलं.
"तो एक असा खेळाडू आहे, जो दबावात चांगला खेळतो. दबाव त्याच्यासाठी चांगल्या संधी निर्माण करतं. शतक करण्याची, विजयी खेळी करण्याची तसंच इंस्टाग्रामवरील आपले फॉलोअर्स वाढवण्याची ही संधी असते. यात काही चुकीचं नाही. त्याचा तो हक्क आहे," असं शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं.
शोएब अख्तरने यावेळी शुभमन गिल, के एल राहुल, रोहित शर्मा यांचा उल्लेख करत मोठी विधानं केली. न्यूझीलंड संघाचा सामना करण्यासाठी ते पुरेसे होते असं त्याने म्हटलं आहे. "न्यूझीलंड संघासाठी शुभमन गिल पुरेसा होता. रोहित शर्मा बाद झाला नसता तर तोदेखील पुरेसा होता. जर के एल राहुल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आला असता तर त्याने सामना संपवला असता. भारताची फलंदाजी फळी मोठी आहे," असं शोएब अख्तर म्हणाला.
विराट कोहलीने काय केलं हे सर्वांनीच पाहिलं. पण राहुलनेही आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती. सूर्यकुमार रनआऊट झाला नसता तर त्यानेही जबाबदारी पार पाडली असती असं तो म्हणाला.
शोएब अख्तरने मोहम्मद शामीचंही कौतुक केलं आहे. मोहम्मद शामीने या सामन्यात 5 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. "न्यूझीलंड संघ 300 ते 350 धावा कऱणार नाही यामध्ये मोहम्मद शामीने मोलाची भूमिका निभावली. तो थोडा महागडा पडला, पण त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत हे पाहता त्याकडे दुर्लक्ष करु शकतो. त्याने आपलं कौशल्य दाखवलं आहे. भारताने अशीच गोलंदाजी कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी फळी आहे. त्यामुळे भारताकडे वर्ल्डकप जिंकण्याची पुरेपूर संधी आहे," असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे.